पनवेल येथील इंडियाबुल्स विलगीकरण कक्षात २२ दिवसांपासून असणाऱ्या नवी मुंबईतील करोना संशयित रुग्णांचा संताप शनिवारी उफाळून आला. या कक्षातील संशयित रुग्णांनी थेट महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाच घेराव घालून जाब विचारला. करोनाच्या संशयित रुग्णांचा चाचणी अहवाल २२ दिवसांनंतरही दिला नसल्याने त्यांचा संताप अनावर झाला. डॉक्टरांशी बोलल्याशिवाय आपण विलगीकरणातून हलणार नाही असा पवित्रा यश केंद्रातील संशयित रुग्णांनी घेतला. या केंद्रातील संशयित रुग्णांमध्ये लहान मुलांचाही समावेश असून त्यांचे हाल होत असल्याचे सांगण्यात येते. पनवेल येथील इंडिया बुल्स विलगीकरण केद्रांत ५०० पेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आणि संशयित रुग्ण आहेत. या इमारतीमधील केंद्र ५ मधील रुग्ण संतप्त होऊ न बाहेर पडले. त्यांनी समोर घनकचरा विभागाचे अधिकारी दिसल्यावर त्यांना जाब विचारला. मात्र हे अधिकारी सफाई कामकाज बघण्यास गेले असल्याने त्यांनी डॉक्टर येईपर्यंत थांबण्याची विनंती त्यांना केली. मात्र रुग्णांनी आक्रमक पवित्रा घेऊन ठिय्या दिला.
संग्रहित लेख, दिनांक 10th May 2020 रोजी प्रकाशित
संशयित रुग्णांचा विलगीकरण कक्षात ठिय्या
डॉक्टरांशी बोलल्याशिवाय आपण विलगीकरणातून हलणार नाही असा पवित्रा यश केंद्रातील संशयित रुग्णांनी घेतला
Written by लोकसत्ता टीम
First published on: 10-05-2020 at 00:46 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sit in the isolation room of suspected patients abn