नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात रविवारपासून चोवीस तासांत घरफोडीचे सहा गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. त्यात एकूण १२ लाख ८५ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे.. या सहा घरफोडींपैकी एका ठिकाणी चोराच्या हाती काहीही सापडले नाही.

ऐरोली येथे सेक्टर चार येथे शिवाजी हंचाटे हे राहतात. कामानिमित्त ते रविवारी रात्री बाहेरगावी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी (सोमवारी ) त्यांचे घर उघडे दिसल्याने याबाबत त्यांच्या पुतण्याला कळले. घरातील ऐवजाची पाहणी केली असता घरातील २ लाख ५० हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या, १ लाख २५ हजार रुपयांचे ब्रेसलेट आणि १ लाख ७५ हजार रुपयांची सोनसाखळी आढळून आली नाही. चोरट्याने कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेरुळ सेक्टर २० येथे राहणारे रमण चंद्र यांच्या घरात चोरी झाली आहे. २१ तारखेला रात्री दहाच्या सुमारास दरवाजाचा सेफ्टी लॉक तोडून चोराने घरात प्रवेश केला होता. घरात घुसून चोराने ४५ हजार रुपयांचा महागडा मोबाइल, ५०० रुपयांचे मनगटी घड्याळ, तर हजार रुपयांचे मनगटी घड्याळ असा ४७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक मयूर पवार तपास करीत आहेत.

नेरुळ सेक्टर २० येथे राहणाऱ्या शैलाबी पठाण यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला आहे. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घराचा कडीकोयंडा उचकटून चोरट्याने घरात प्रवेश केला, मात्र त्याला काहीही किमती ऐवज न मिळाल्याने तो निघून गेला असे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

खारघर सेक्टर ३ बेलपाडा येथे आनंद पाटकर हे राहतात. सोमवारी सकाळी सात ते आठच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातून चोरट्याने चोरी केली तसेच खारघर सेक्टर १० येथे राहणारे तेजस भोंग यांच्याही घरात चोरी झाली आहे. दोघांच्या घरात मिळून ६६ हजार रुपयांचे सहा मोबाइल आणि एक लॅपटॉप चोरी झाला आहे.