नवी मुंबई: तुर्भे एमआयडीसी येथे मनपाने सुरु केलेले विकास काम अर्धवट सोडल्याने उघड्या मॅनहोल मध्ये पडून अनेक जण जखमी झाले. या बाबत अनेकदा काम पूर्ण करा अशी मागणी करूनही प्रशासनाने कुठलीही हालचाल केली नाही. त्यामुळे शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तुर्भे विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
तुर्भे एमआयडीसी इंदिरानगर येथे बगाडे कंपनी नजीक जो कलव्हर्ट गेलेला आहे. तो कलव्हर्ट पूर्णपणे जाम झाला असल्याने मुख्य रस्ता व सेवा रस्ता याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठते. या ठिकाणी पाणी साचणार नाही याकरिता या कलव्हर्टला दोन चेंबर्स तयार करण्यात यावेत अशी मागणी अनेकदा केली होती. मात्र या कडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले. मात्र उशिरा का होईना काम सुरु केले. हे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु त्या ठिकाणी खोदकाम केल्यानंतर चेंबर न बनवता झाकण न लावता असेच उघडे ठेवण्यात आले होते. असा दावा शिवसेनेने केला. शिवाय येथे मॅनहोल उघडे असल्याने लक्षात यावे म्हणून बॅरीगेट वा तत्सम कुठलीही उपायोजना केली नव्हती. त्यामुळे २४ तारखेला सहा लोक या मॅनहोल मध्ये पडून जखमी झाले होते, असा दावा शिवसेनेने केला आहे.
आणखी वाचा- नवी मुंबई: शहरातील ११ अवैध शालेय वाहनांनावर कारवाई
शेवटी परिसरातील नागरिकांनीच पत्र्याचे तुकडे लाकडाची पट्टी, पाण्याचे पिंप यांच्या साहाय्याने उघड्या गटारे व खोदकाम केलेल्या ठिकाणच्या सभोवताली ठेवले. जेणेकरून कोणाला दुखापत होऊ नये. या बाबत अनेकदा सांगूनही कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे शेवटी तुर्भे विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे तसेच उघडे गटार बंद करून पाणी साठू नये यांच्या उपाययोजना कराव्या अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील उपशहर प्रमुख महेश कोटीवाले उपशहरप्रमुख प्रकाश चिकणे, विभागप्रमुख बाळकृष्ण खोपडे,उपविभाग प्रमुख किशोर कांबळे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.