नवी मुंबई शहरात स्वच्छता आणि कचरा वर्गीकरणाचे महत्व पटवून देण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत . नवी मुंबई महापालिकेने नवी मुंबईकरांना ओला, सुका आणि घातक कचरा असे वर्गीकरण सक्तीचे केले आहे. मागील दोन वर्षांपूर्वी ई कचरा वर्गीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत होता. मात्र यंदा गेल्या आठ महिन्यात ६ हजार किलोहून अधिक इलेक्ट्रॉनिक कचरा संकलित झाला आहे. कालांतराने ई कचरा वर्गीकरणाला प्रतिसाद मिळत असल्याचे समोर येत आहे.
घनकचरा व्यवस्थापनाकडून वेगवेगळे उपक्रम राबवून महापालिकेने देशात उच्च स्थान प्राप्त केले आहे. इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेच्या वतीने शहारतील ८ ही विभागात ई कचऱ्यासाठी लाल रंगाच्या कुंड्या बसविण्यात आल्या आहेत. तसेच रोटरी क्लब आणि ईकोटोपीया या खासगी संस्थांकडून इ कचरा संकलित केला जात आहे. कचरावर्गीकरण, व्यवस्थापन यामध्ये पालिकेची सुव्यवस्थित नियोजन करून अंमलबजावणी सुरू आहे. ई कचऱ्यामध्ये निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश होतो.
हेही वाचा : पनवेल : एका मृत उंदरामुळे ‘महाभारत’ , नातेवाईकांत हाणामारी, गुन्हा दाखल
यामध्ये संगणकाचे विविध सुटे भाग, बंद पडलेला मोबाईल, टीव्ही संच, जुन्या वाहनांचे सुटे भाग, मोबाईल चार्जर, सीडी, इत्यादी वस्तू वापराविना कचऱ्यात जातात. हा ई कचरा नित्याच्या कचऱ्यात टाकल्यास पुढे त्याचे विघटन होत नसल्याने अडथळे निर्माण होतात. त्यामुळे आधीच नागरिक स्तरावर याचे वर्गीकरण होण्यासाठी ई कचरा संकलित केला जात आहे. शहरात जानेवारी ते ऑगस्टपर्यंत एकूण ६ हजार १२४किलो यामध्ये परिमंडळ १ मधून ३ हजार २३७किलो तर परिमंडळ २ मध्ये २ हजार ८८७किलो ई कचऱ्याचे संकलन करण्यात आलेले आहे.