उरण तालुक्यात सिडकोने तयार केलेले साठवणूक तलाव मातीच्या गाळाने भरले आहेत. त्यामुळे येथील गावांना भरतीचे पाणी जाऊन घरांचे नुकसान होत आहे. या संदर्भात उरणच्या आमदारांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्याने राज्याचे नगरविकासमंत्री म्हणून खुद्द मुख्यमंत्र्यांना या प्रश्नावर उत्तर द्यावे लागले. तसेच या समस्येची विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही दखल घेतली.
सिडकोने उरण तालुक्यातील समुद्राच्या भरतीचे पाणी नियंत्रित करण्यासाठी तयार केलेली योजना नादुरुस्त झाल्याने येथील गावात समुद्राचे पाणी जात असल्याचे आमदार मनोहर भोईर यांनी उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्र्यांनीच उत्तर दिले. यात २००५, त्यानंतर या वर्षांत खारफुटीसंदर्भात उच्च न्यायालयात सिडकोने याचिका दाखल केलेली होती. यात द्रोणागिरी वगळून इतर ठिकाणच्या साठवणूक तलावातील गाळ काढण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर पुन्हा २०१२ ला दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने सीआरझेड येते का या संदर्भात महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अ‍ॅथॉरिटीला प्रत्यक्ष सव्‍‌र्हेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच द्रोणागिरीमध्ये साठवणूक तलावातील गाळ काढण्यासाठी पुन्हा एकदा न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचेही उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.