नवी मुंबई शहर आणि एमआयडीसी परिसरातून जाणारी एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी राडारोडय़ाच्या विळख्यात सापडली आहे. भूमाफियांनी सिमेंट काँक्रीटचा भराव टाकून ही जागा गिळंकृत करण्याचा सपाटा लावला आहे. यात डोंगरालगतची बहुतांश जागा हडप करण्यात येत आहे. जलवाहिनीला एखाद्या ठिकाणी गळती लागल्यास ती दुरुस्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
रबाळे एमआयडीसी परिसरातून नवी मुंबई आणि ठाण्याला पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची मोठी वाहिनी आहे. या परिसरातील रबाळे, यादव नगर, चिंचपाडा, परिसरातून ही जलवाहिनी जात असताना या ठिकाणच्या झोपडपट्टय़ांनी जलवाहिनीच्या दोन्ही बाजूंवर अतिक्रमण केले आहे. त्यातच जलवाहिनीच्या दोन्ही बाजूला भराव टाकून येण्याजाण्यासाठी जलवाहिनीचा जणू रस्ताच तयार केला आहे. त्यामुळे ही जलवाहिनी धोक्यात आली असून एखादी दुर्दैवी घटना घडल्यास सर्वाधिक फटका झोपडपट्टीमुळे एमआयडीसीच्या जलवाहिनीला बसवण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान जलवाहिनीला झोपडपट्टय़ांनी गिळकृत केल्यानंतर या ठिकाणी जलवाहिनीवर भूमाफियांनी सिमेंट काँक्रीट आणि राडारोडा टाकून येण्याजाण्यासाठी मार्ग तयार केला आहे. कंपनीतील कचरा आणि रेती, विटा या ठिाकणी टाकल्याने काही ठिकाणी जलवाहिनी त्याखाली गाडली गेली आहे. जलवाहिनी फुटल्यास वा त्या ठिकाणी काम करावयाचे असल्यास कचरा साफ करून जलवाहिनी दुरुस्तीचे काम करावे लागत आहे.
एमआयडीसीच्या नियमाप्रमाणे जलवाहिनीपासून कमीन १०० मीटरवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण किंवा स्फोटक कंपनी नसावी अशी नियमावली आहे. मात्र ही नियमावाली भूमाफियांनी आपल्याच धाब्यावर बसवत जलवाहिनीच्या दुतर्फा झोपडय़ा आणि डेब्रिज टाकण्याचं काम सुरू केलं आहे.
एमआयडीसीने जलवाहिनीच्या नजीक माहितीफलक उभारणे अनिवार्य असतानादेखील मागील काही दिवसांपूर्वी रंगरंगोटी करण्यात आलेल्या जलवाहिनीवर एमआयडीसीचे नावदेखील टाकलेले नाही. त्यातच या ठिाकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नसल्याने बिनधास्तपणे पाणी चोरी सुरू होत आहे. भूमाफियांच्या संगनमताने रबाळे एमआयडीसी परिसरात पाणी चोरी सुरू असल्याचेदेखील बोलले जात आहे. एमआयडीसीची ही जलवाहिनी आता झोपडपट्टी आणि डेब्रिजच्या विळख्यातून कधी मुक्त होणार हा प्रश्न अधांतरी आहे.
टोलावाटोलवी
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेचे डेब्रिज शोध पथक आहे. एमआयडीसी परिसरात टाकण्यात येणारे डेब्रिज हे शहरातील एखाद्या इमारतीचे किंवा रस्त्याच्या खोदकामाचे असते. पंरतु महानगरपालिका केवळ एमआयडीसीची हद्द असल्याने या ठिकणच्या डेब्रिज टाकणाऱ्यावर कारवाई करत नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. दोघांच्या टोलावाटोलवीत मात्र एमआयडीसीची जलवाहिनी डेब्रिजने गाडली जात आहे.
एमआयडीसी परिसरात जलवाहिनीला लागून डेब्रिज टाकण्यात येत आहे ही बाब सत्य आहे. पण डेब्रिज काढण्याची जवाबदारी ही पालिकेच्या डेब्रिज शोधपथकांची आहे. पण पालिकेकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात डेब्रिज या ठिकाणी पडत आहे.
प्रकाश चव्हाण , एमआयडीसी कार्यकारी अभिंयता