दिघ्यातील बिंदुमाधव नगरातील एमआयडीसीच्या मालकीचा आणि प्रस्तावित दिघा रेल्वे स्थानकासाठी आरक्षित भूखंडावर भूमाफियांनी झोपडय़ा उभारल्या आहेत. याला येथील काही राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे. २५ हजार रुपयांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंत या झोपडय़ा विकल्या जात आहेत.
दिघा परिसरात एमआयडीसीच्या जागेवर बेकायादा झोपडय़ा आणि इमारती उभारल्या गेल्या आहेत. दिघ्यातील बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याच वेळी भूमाफियांनी बेकायदा झोपडय़ा उभारण्यास सुरुवात केली आहे.
बिंदुमाधव नगर आणि आंबेडकर नगर परिसरातील झोपडीदादांनी रेल्वेस्थानकासाठीचा आरक्षित भूखंड गिळंकृत केला आहे. विशेष म्हणजे प्रस्तावित दिघा रेल्वेस्थानक परिसरात रुळांलगत बेकायदा इमारती आणि झोपडय़ा उभारल्या गेल्या आहेत. काही ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी शाळा, प्रार्थनास्थळे उभारली गेली आहेत.
आमदार संदीप नाईक यांच्या निधीतून या ठिकाणी नाला उभारण्यात आला आहे. या नाल्याचा आडोसा घेऊन गेल्या पावसाळ्यात बेकायदा झोपडय़ा बांधण्यात आल्या. याशिवाय भंगारवाल्यांचे गाळेही बांधले जात आहेत. मध्यंतरी या बेकायदा झोपडय़ांवर नवी मुंबई महापालिका आणि एमआयडीसी यांनी कारवाई केली होती; मात्र अतिक्रमण विरोधी विभागाची पाठ वळताच पुन्हा बेकायदा झोपडय़ांचे पेव फुटले आहे. गेल्या दोन वर्षांत साधारण ३०० ते ४०० झोपडय़ा या ठिकाणी उभारल्या आहेत. याबाबत नगरसेवक नवीन गवते यांनी सदरच्या जागेवर दफनभूमी उभारण्यासाठी आपण पाठपुरवा करत असल्याचे सांगितले.
बिंदुमाधव नगर आणि आंबेडकर नगरातील भूखंडावर वारंवार कारवाई करूनही झोपडय़ा उभारल्या जात आहेत. हा भूखंड दिघा रेल्वे स्थानकासाठी राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. बेकायदा झोपडय़ा तत्काळ हटविल्या जातील.
– अविनाश माळी, उपअभियंता, एमआयडीसी