* प्रत्येक प्रकल्पाची स्वतंत्र माहिती देण्यासाठी ७५ कक्ष
* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहणी करणार
केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’अगोदर आपली ‘स्मार्ट सिटी’ तयार व्हावी यासाठी सिडको प्रशासनाने कंबर कसली असून शुक्रवारी दुपारी तीन वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या सर्व प्रकल्पांची माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी वाशी येथील सिडकोच्या भव्य प्रदर्शन केंद्रात ७५ कक्ष मांडण्यात आले आहेत. एखाद्या महामंडळाने विहित मुदतीत पूर्ण होणारे व खर्च जाहीर करणारे प्रकल्प जनतेला सादर करण्याची ही पहिलीच वेळ असून शनिवार, रविवारी हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे. खारघर परिसरातील सात उपनगरांचा समावेश असलेली दक्षिण ‘स्मार्ट सिटी’ सिडको तयार करीत असून त्यावर ३५ हजार कोटी खर्च करणार आहे. या ३५ हजार कोटी व्यतिरिक्त आणखी १८ हजार कोटी रुपये खर्च होणार असल्याने हा विकास ५३ हजार कोटींच्या घरात जात आहे.
देशात ९८ ‘स्मार्ट सिटी’ निर्माण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने स्थानिक प्राधिकरणांकडून प्रस्ताव मागितले आहेत. त्यासाठी ९८ शहरांतील शासकीय संस्थांचे प्रयत्न सुरू झाले असून या ९८ पैकी पहिल्या दहा पात्र शहरांची घोषणा २६ जानेवारी रोजी होणार आहे. केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे ‘स्मार्ट सिटी’ तयार करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रत्येक वर्षी ५०० कोटी रुपये देणार असून स्थानिक प्राधिकरण त्यात २०० कोटी रुपये जमा करुन १२०० कोटी रुपये खर्चाचा वार्षिक आराखडा तयार करणार आहे. या स्पर्धेत नामांकन मिळावे यासाठी सिडकोने गेल्या वर्षी प्रयत्न केले होते मात्र सिडको एक सक्षम आर्थिक संस्था असल्याने त्यांच्या क्षेत्राचा यात विचार करण्यात आला नाही. त्यामुळे सिडकोने येत्या पाच वर्षांत स्वखर्चाने पनवेल व उरण तालुक्यातील सात नोडची एक स्वतंत्र ‘स्मार्ट सिटी’ तयार करण्याचा संकल्प सोडला आहे. यात विकसित व अर्ध विकसित नोडसाठी ब्राऊन फिल्ड सिटी तयार केली जाणार असून पुष्पकनगर या नव्या उपनगराला ग्रीन फिल्ड स्वरूप दिले जाणार आहे. हा स्वतंत्र २३० हेक्टरचा भाग असून त्यावर ९४१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. केंद्र सरकारने ‘स्मार्ट सिटी’साठी लागू केलेले २४ निकष तर सिडको पूर्ण करणार आहे. याशिवाय दहा इतर निकषांचा यात विचार करण्यात आला आला आहे. त्यात स्मार्ट संस्था, पारदर्शकता, पर्यावरण, स्वच्छ भारत, जीवनशैली, नियोजन, पायाभूत सुविधा, परिवहन, बंदर विकास, आणि आर्थिक स्वायत्तता यांचा सहभाग आहे. सिडकोच्या नियोजन विभागाचे २२ व अभियांत्रिकी विभागाचे १६ कक्ष मांडण्यात आले आहेत. याशिवाय अर्थशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, परवाने, विशेष प्रकल्प सादर करणाऱ्या कक्षांचा समावेश आहे. या सर्व कामांवर होणारा खर्च आणि ती पूर्ण होणारी मुदत यात नमूद करण्यात आली आहे. अल्प व अत्यल्प उत्पन्न गटासाठी नवी मुंबई सिडको दक्षिण ‘स्मार्ट सिटी’ भागात तयार होणाऱ्या ५५ हजार घरांसाठी १० हजार ७०० कोटी रुपये खर्च केले जाणार असून हा प्रकल्प येत्या चार वर्षांत पूर्ण होईल, असे आश्वासन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी दिले आहे.

सिडकोच्या सर्व प्रकल्पांची माहिती वेबसाइटवर उपलब्ध आहे, मात्र या प्रदर्शनाच्या निमित्ताने नागरिकांना या प्रकल्पांची माहिती व्हावी आणि त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे, यासाठी ही संधी देण्यात आली आहे.
– डॉ. मोहन निनावे,
मुख्य जनसंर्पक अधिकारी, सिडको