उरण : एप्रिल महिन्यात नवी मुंबई विमानतळ सुरू होणार आहे. याचे संकेत अर्थसंकल्प मांडताना विधानसभेत देण्यात आले आहेत. तर केंद्र आणि राज्य सरकारने नवी मुंबई विमानतळाला ९९ टक्के दिबांचे नाव देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. विमानतळ सुरू होण्यास अवघा एक महिना उरला असतानाही नामकरण न झाल्याने स्थानिक भूमिपुत्रांमध्ये नाव मिळणार का या बाबत शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नामकरण समितीच्या वतीने रायगड,मुंबई, ठाणे व पालघर या चार जिल्ह्यातून जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिली आहे. त्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
नवी मुंबई विमानतळ नामकरण मागणीसाठी सर्वपक्षीय समितीने दिल्लीत केंद्रीय नागरी विमानन मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी पुन्हा एकदा केंद्राने दिबांच्या नावाचे आश्वासन दिले आहे. तसेच यासाठी एकमेव दिबांच्याच नावाचा प्रस्ताव असल्याचेही स्पष्ट केले होते. तत्कालीन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही अशा प्रकारचे आश्वासन दिले होते. मात्र मार्च २०२५ पासून नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित होणार असून अजून पर्यंत दिबांच्या नावाचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आलेला नसल्याने नामांतरणाचा निर्णय केव्हा होणार असा प्रश्न आता भूमिपुत्रांना पडला आहे.
भूमिपुत्रांच्या संघर्षामुळे केंद्र सरकार नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. लवकरच नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव जाहीर केले जाईल अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाला दिली होती. त्यानंतर लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने नामकरणाचा पाठपुरावा आणि सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी नवी दिल्ली येथे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने केंद्रीय मंत्री नायडू यांची भेट घेतली. त्यांनी दिबांच्या खेरीस कोणाच्याही नावाचा प्रस्ताव मंत्रालयाकडे आला नसल्याचे स्पष्ट केले होते.
राज्य सरकारने पाठवलेला नामकरणाचा प्रस्ताव प्रक्रियेचा भाग म्हणून मंजुरीसाठी पाठवला आहे. याच प्रक्रियेचा भाग म्हणून पीएमओ आणि कॅबिनेटकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत मंत्रीमहोदयांनी विमानतळ सुरू होण्याआधी नामकरणाची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दिबांचे नाव जाहीर करू असे आश्वासनही दिले होते.