अरुणोदय अपार्टमेन्ट ओनर्स असोसिएशन, नेरुळ सेक्टर-१०
दोन भव्य प्रवेशद्वारे, चारही बाजूंनी संरक्षक भिंतींच्या आत लावलेली विविधरंगी फुलझाडे, इमारतींच्या मध्यवर्ती भागातील मोकळ्या जागेचा कुशलतेने केलेला वापर, या कारणांमुळे आर्थिकदृष्टय़ा दुर्बल गटातील नागरिकांसाठी सिडकोने नेरुळ सेक्टर-१० मध्ये बांधलेली अरुणोदय सोसायटी येणाऱ्याचे लक्ष वेधून घेते.
अरुणोदय अपार्टमेन्ट ओनर्स असोसिएशन असे या गृहसंस्थेचे नाव. इमारत तीन विंगमध्ये बांधण्यात आली आहे. प्रत्येक विंगमध्ये दहा घरे अशी रचना आहे. संकुलात एकूण १५० कुटुंबे राहतात. यात प्रत्येक इमारतीतील १ ते ८ क्रमांकाच्या घराची रचना ‘वनरूम किचन’ आणि ९ व १० क्रमांकांच्या घराची रचना ‘टु बीचके’ स्वरूपात आहे.
इमारतीच्या आतील आवारात पेव्हर ब्लॉकच्या साहाय्याने अंतर्गत सजावट करण्यात आली आहे. आंबा आणि नारळाची आत झाडे लावण्यात आली आहेत. आवारात खेळताना मुलांना उन्हाळ्यातही झळांचा तडाखा बसत नाही.
१९९० साली सोसायटीच्या मध्यवर्ती भागात सभामंडप उभारण्यात आले. २००० साली सभासदांमधून देगणीच्या रूपाने काढलेल्या पैशातून इमारतीच्या काही भागांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. इमारतीच्या छपरावर पत्र्याचे शेड टाकण्यात आले. या सभामंडपात संस्थेतील कार्यक्रम आयोजित केले जातात. सभासदांचे वाढदिवस, साखरपुडय़ासाठी नाममात्र भाडे आकारून साजरे केले जातात. याशिवाय महिलांसाठी खास सण मकरसंक्रांतत, वटपौर्णिमा, महिला दिनाच्या वेळी सर्व महिलांना एकत्र येऊन सभामंडपात सण साजरे करतात. तुलसी विवाह ही येथील कार्यक्रमांची पर्वणी. इमारतीच्या दर्शनीय भागातील तुळशी वृंदावनामुळे सभामंडपाच्या शोभेत भर पाडते. याशिवाय होळी, दहीहंडी हे सण आवारात पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. यासाठी सभासद वर्गणीतून खर्च करण्यात येतो. सभामंडपाच्या बाजूलाच ज्येष्ठांसाठी विरंगुळा म्हणून ज्येष्ठ नागरिक कट्टा बांधण्यात आला आहे. या कट्टय़ावर सकाळ-सायंकाळ ज्येष्ठांबरोबर तरुण मंडळीही गप्पा मारण्यात रमतात. चारचाकी वाहनांच्या पार्ंगसाठी मध्यवर्ती भागात तर दुचाकीसाठी इमारतीच्या डाव्या कोपऱ्यात खास जागा ठेवण्यात आलेली आहे. असोसिएशनचा असणारा गणेशोत्सव हे या सोसायटीचे खास वैशिष्टय़ आहे. ७ दिवस श्रीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. २८ वर्षांपासूनची या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आहे. टाकाऊ पासून टिकाऊ या संकल्पनेवर भर देत सजावट साकारण्यात येते. श्रींची मूर्ती आठ फूट भव्य असते. सुंदर देखाव्यासाठी या गणपतीला महापालिकेचे पारितोषिक मिळाले आहे. यावेळी आरोग्य शिबीर भरविण्यात येते. यात मोफत तपासणीबरोबरच आरोग्यविषयक सल्ले देण्यात देण्यात येतात.
या शिवाय आवारात या सात दिवसांत माणुसकीची भिंत हा उपक्रम चालविला जातो. कपडा बँक या नेरुळ येथील संस्थेला जमा होणारे जुने-नवे कपडे स्वेच्छेने सभासद दान करतात. यावेळी लहान मुलांसाठी, महिलांसाठी रोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात येतात. त्यात वेषभूषा, पाककला स्पर्धा, काव्य, वक्तृत्व, रांगोळी यांसारख्या स्पर्धाचा समावेश असतो. ‘विघ्नहर्ता अरुणोदय’ असे फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे. याला १००० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय गणेशोत्सव मंडळाची वेबसाईट सुरू करण्यासाठी तरुणांचे प्रयत्न सुरू आहेत. अवाजवी खर्चाला कात्री लावून गरजूंसाठी निधीचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी घरगुती डेकोरेशन विकून निधी जमविण्यात येतो.
दिवाळीला सोसायटीच्या मध्यवर्ती भागात एक मोठा कंदील लावण्यात येतो. समान आकाराचे सर्व सभासदांना कंदील वाटप करण्यात येते. पाणी बचतीसाठी सक्ती केली जाते. याशिवाय कार्यालयाबाहेरील सूचनाफलकावर महत्त्वाच्या नोटिसा लावण्यात येतात. १५ ऑगस्टला होणाऱ्या वार्षिक सभेत जमाखर्च अहवाल सादर करून सभासदांची मान्यता घेण्यात येते. ओला आणि सुका कचरा वैयक्तिक पातळीवर वेगळा करण्यात येतो. इमारतीच्या आवारातील स्वच्छतेसाठी सफाई कामगार ठेवण्यात आला आहे. सुरक्षारक्षक दिवस-रात्र पाळ्यांमध्ये काम करतात. सोसायटीचे व्यवहार धनादेश आणि रोख स्वरूपात होतात. ही सगळी कामे खजिनदार चालवतात. सोसायटीच्या आवारातील झाडांची फळे विकून सोसायटीच्या निधीत त्या रकमेचा समावेश करण्यात येतो. राष्ट्रीय सणाच्या वेळी झेंडावंदन आर्मी वा पोलीस विभागात काम करणाऱ्या सभासदांच्या नातेवाईकांमार्फत केले जाते. ज्या रहिवाशांच्या घरासमोर झाडे आहेत ते रहिवासी झाडांना पाणी देण्याचे काम स्वीकारतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने इमारतीच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे माजी अध्यक्ष लक्ष्मण पोपळघट यांनी सांगितले.