नेरुळ सेक्टर-२० मधील संदीप अपार्टमेंटमध्ये झालेली ४० लाखांची चोरी पोलिसांनी अवघ्या चार तासांत उघड केली. घरी राहण्यास आलेल्या सासूकडील रक्कम जावयानेच लंपास केल्याचे तपासात उघड झाले. नवे घर विकत घेण्यासाठी हंसा परमार या मुंबईतील घर ४३ लाखांना विकून नेरुळ येथे मुलीकडे राहण्यास आल्या होत्या. २९ मार्च रोजी मुलगी शीतल हिच्यासोबत त्या नवे घर पाहण्यासाठी स्वत:सोबत एक लाख रुपये घेऊन बाहेर निघून गेल्या. याचा फायदा घेत जावई अमेय शेठ याने घराचे कुलूप बदलून घरात चोरी झाल्याचा देखावा केला आणि कपाटातील रक्कम आणि दागिने लंपास केले.
हा प्रकार पाहून हंसा परमार आणि त्यांची मुलगी शीतल शेठ यांनी पोलिसांत घरफोडीची तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला असता ही चोरी घरातील व्यक्तीच्या साहाय्यानेच केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला.
नेरुळ पोलिसांनी खाक्या दाखवताच ताब्यात घेण्यात आलेला आरोपी जावई अमेय याने आपण सासूला धडा शिकवण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी ४ लाख ६७ हजार रुपयांचे दागिने ४२ लाखांची रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son in law turned to burglary and stole rs 46 lakh in navi mumbai