नवी मुंबई : संतुलित आहारात आता ज्वारीला ही महत्व प्राप्त झाले आहे,त्यामुळे ज्वारीला सर्व स्तरातून मागणी वाढत आहे. मात्र यंदा पडलेल्या अवकाळी पावसाने ज्वारीच्या उत्पादनाला फटका बसला होता. त्यामुळे यंदा ३० टक्के ते ४० टक्के उत्पादन कमी आहे.त्यामुळे मागणी असून पुरवठा कमी असल्याने दरात दिवसेंदिवस वाढच होत आहे. किरकोळीत अस्सल सोलापूर ज्वारी ६०रुपये किलो दराने तर घाऊक बाजारात ५२रुपयांनी विक्री होत असून १३%दरवाढ झाली आहे. त्यामुळे ज्वारीलाही महागाईचा ज्वर चढत आहे.
पूर्वी ज्वारीची खरेदी काही ठराविक वर्गाकडून केली जात होती. गरिबाच्या घरची भाकरी म्हणजे ज्वारीची भाकरी हे समीकरण अगदी पक्के झाले होते. मात्र आता संतुलित आहारामध्ये ज्वारीची भाकरी खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे गृहिणी आपल्या जेवणात चपाती बरोबर ज्वारी, ज्वारी-तांदूळ भाकरीचा समावेश करू लागले आहेत. मात्र आता ज्वारी महाग झाल्याने गृहिणींनी ज्वारी कमी खाण्याला पसंती देत आहेत. ज्वारी-तांदूळ मिक्स भाकरीमध्ये सम प्रमाण वापरले जात होते. मात्र आता गृहिणीं या मिक्स भाकरीत ज्वारी दिवसेंदिवस महाग होत असल्याने त्यामध्ये तांदळाचे प्रमाण वाढविणे पसंत करीत आहेत. बाजारात ज्वारीची सोलापूर,आंध्रप्रदेश, कर्नाटक येथुन आवक होत असते.
हेही वाचा >>>नवी मुंबई : घटना जूनमधील गुन्हा दाखल ऑक्टोबरमध्ये, पीडित व्यक्तीचे दोन हात गेले…
मात्र सध्या बाजारात सोलापूर येथील आवक होत आहे. फेब्रुवारीमध्ये नवीन ज्वारी बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते. बाजारात नवीन उत्पादन दाखल होताच दर आवाक्यात येण्याची शक्यता आहे. एपीएमसीत एप्रिल-मे पासून ज्वारीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सध्या एपीएमसीत १७४६क्विंटल ज्वारी दाखल झाली आहे. सप्टेंबर मध्ये घाऊक बाजारात उच्चतम सोलापूरी ज्वारी ४६रुपये किलोने विक्री होत होती तर किरकोळ बाजारात ५४रुपयांवर होती.”मात्र आता पुन्हा १३%दरवाढ झाली असून घाऊकमध्ये ५४रुपये तर किरकोळ बाजारात ६०रुपयांवर पोचली आहे.
यंदा अवकाळी पावसाने ज्वारीच्या उत्पादनाला फटका बसला असून दर वाढले आहेत. यंदा अवघे ३०% ते ४०%उत्पादन आहे . त्यात मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने ज्वारीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.-निलेश विरा, संचालक, अन्न-धान्य बाजार, एपीएमसी