नवी मुंबई : ग्लोबल वॉर्मिगमुळे उन्हाळयात अंगाची काहिली होत असताना झाडांचे महत्त्व अधोरिखित होत आहे. उन्हाळय़ात या विषयावर चर्चा करीत बसण्यापेक्षा पावसाळय़ात वृक्ष लागवड किंवा फळ बियांचे रोपण करण्याचा एक उपक्रम उरण तालुक्यातील सारडे विकास मंच आणि हितेंद्र घरत मित्र परिवाराच्या पुढाकाराने उरणमधील सारडे गावाच्या मागील डोंगरात दोन लाख आंबा, काजू, फणस, जांभूळ, कोकम यांच्या बियांची रविवारी पेरणी करण्यात आली.
एवढय़ा मोठय़ा प्रमाणात फळ बियांची पेरणी या परिसरात पहिल्यांदाच करण्यात आली आहे. दगडखाणी आणि वणव्यामुळे जंगल ओसाड होत असताना सुरू करण्यात आलेला हा उपक्रम अनेकांना प्रेरणादायी ठरणार आहे. दोन लाख बियांमधून केवळ दोन हजार बियांचे रोपण झाले तरी पुरेसे आहे अशी भावना हितेंद्र घरत यांनी व्यक्त केली आहे. महामुंबई क्षेत्रातील सह्याद्री पर्वत रांगा दगडखाणी, जंगलतोड, वणवा, प्रदूषण यामुळे उजाड झाले आहेत. या डोंगरावर वृक्ष लागवड करण्याचा प्रयत्न काही सामाजिक संस्था करीत असतात. वन विभाग या ओसाड डोंगरांकडे फारसे लक्ष देत नाही. त्यामुळे उरण व पनवेल तालुक्यातील डोंगरावर उन्हाळय़ात मोठय़ा प्रमाणात वणवे लागत असून या मोठी वनसंपदा नष्ट होत आहे. हे वणवे विझवण्याचे काम काही संस्था करीत आहेत पण अपुऱ्या मनुष्यबळामुळे आग विझवण्यात त्यांनाही अपयश येत असल्याचे दिसून येते.
उपक्रम दरवर्षी
उजाड झालेल्या या जंगलात पुन्हा वनसंपदा निर्माण करण्याच्या दृष्टीने सारडे विकास मंच आणि हितेंद्र घरत मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमान आषाढी एकादशीचे औचित्य साधून रविवारी दोन लाख आंबा, काजू, जांभूळ, फणस, कोकम यांच्या बिया या जंगलात पेरण्यात आल्या. यातील काही बिया जगतील असा विश्वास घरत यांनी व्यक्त केला असून हा उपक्रम दरवर्षी राबविणार असल्याचे हितेंद्र घरत यांनी स्पष्ट केले.