उद्घाटनाविना महिनाभर बसगाडय़ा पडून
नवी मुंबई : महिलांसाठीच्या दहाही विशेष तेजस्विनी बसेस एनएमएमटी प्रशासनाकडे दाखल होऊन रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज आहेत. मात्र या बससह पालिकेच्या इतर उपक्रमांचेही एकाच वेळी उद्घाटन करण्याचा पालिका प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे त्या महिनाभरापासून एनएमएमटीच्या डेपोत पडून आहेत. महिला प्रवाशांना मात्र या बसची उत्सुकता आहे. त्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील महिन्यात पहिल्या आठवडय़ात लागण्याची शक्यता असल्याने केवळ उद्घाटनासाठी या बसेसची रखडपट्टी होणार आहे.
खास महिलांसाठी चालवण्यात येणाऱ्या दहा तेजस्विनी बसेस एनएमएमटीकडे महिनाभरापूर्वी दाखल झाल्या आहेत. सुरुवातीला १५ फेब्रुवारीचा मुहूर्त ठरविण्यात आला होता. याची तयारीही करण्यात आली होती, मात्र अर्थसंकल्पाचे कारण सांगत उद्घाटन पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर १५ दिवस गेले तरीही या बसगाडय़ा रस्त्यावर आल्या नाहीत. बसगाडय़ा रस्त्यावर धावण्यासाठीच्या आरटीओच्या सर्व आवश्यक परवानग्या तसेच या बसेस चालवण्यात येणारे मार्गही निश्चित करण्यात आलेले आहेत. मात्र एनएमएमटीची ‘आयटीएमएस’ म्हणजेच इंटेलिजेंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टम व पालिकेतील आणखी काही महत्त्वाची उद्घाटने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याबाबत प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यामुळेच तेजस्विनीचा मुहूर्तही लांबणीवर पडला असल्याचा आरोप परिवहन सदस्य सुधीर पवार यांनी केला आहे. तर एकीकडे ‘एनएमएमटी’ तोटय़ात असताना या बसगाडय़ा चालवल्यास परिवहन उपक्रमाच्या तिजोरीत चांगले उत्पन्न येऊ शकते. असे असताना महिनाभर या बसेस केवळ उद्घाटनाविना पडून असल्याचे परिवहन सदस्य समीर बागवान यांनी सांगितले. याबाबत परिवहन व्यवस्थापक शिरीष आदरवाड यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
आचारसंहितेत अडकणार
लोकसभेची आचारसंहिता पुढील महिन्यात केव्हाही लागू शकते. या बसेस पुढील आठ दिवसांत सुरू झाल्या नाहीत तर निवडणूक संपेपर्यंत त्या डेपोतच पडून राहण्याची शक्यता आहे. त्यात शाळांना सुट्टय़ा लागल्यानंतर या बस सुरू झाल्या तर महिला प्रवासी कमी भेटून त्यांची उपयुक्तता दिसून येणार नाही.
तेजस्विनीच्या उद्घाटनाबाबत आयुक्तांबरोबर चर्चा झाली असून दोन दिवसांत निश्चित वेळ ठरवणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार की काय, याबाबत काही माहिती नाही.
– रामचंद्र दळवी, परिवहन सभापती