वाशी येथील ‘मिनी सीशोअर’ परिसर सध्या स्पोर्ट्स बाइकच्या आवाजाने दणाणत आहे. यात महाविद्यालयीन विद्यार्थी वेगवान दुचाकीवर मांड ठोकून वाहतुकीच्या नियमांचा भंग करीत आहेत. त्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन फिरावे लागत आहे.
विशेष करून येथे महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे तांडे भटकत असतात. त्यातील काहीजण महाविद्यालयात हजर राहण्यासाठी दुचाकी आणतात. त्यावर कधी कधी दोघांची वा तिघांची बैठक असते. अर्थात ही रपेट धोक्याची आहे, याची जाणीव दुचाकीवरील कोणालाही नसते. नागरिकांनी तसेच वाहनचालकांनी अशा बेफाम बाइकस्वारांना वेळोवेळी समज देऊनही त्यांच्या वर्तनात काडीचाही फरक पडलेला नाही. उलट पादचाऱ्यांना त्रास कसा होईल, यावरच महाविद्यालयीन तरुणांचा भर असतो. यात काही उनाड मुलांचीही त्यांना साथ लाभलेली असते.
अशा मुलांना समजावण्यासाठी कधीतरी त्यांच्याशी वाद घालावा लागतो. त्यामुळे भररस्त्यात वाहने उभी केल्याने इतरांना वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो. महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचे अशा उनाडांवर कोणतेही नियंत्रण नसते. त्यामुळे त्यांचे फावते. या तरुणांच्या वाहतूक पोलिसांनीच मुसक्या आवळल्या तर आमची यातून सुटका होईल, असे मत एका नागरिकाने ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केले.
मिनी सीशोअरसारख्या वर्दळीच्या ठिकाणी दुचाकी भरधाव चालवल्या जात असतील तर त्याचा धोका लहानग्यांना होण्याचा संभव अधिक आहे. कारण आईवडिलांबरोबर आलेली मुले इथे मुक्तपणे खेळत असतात. लहानग्यांवर सतत लक्ष ठेवणे अनेकांना जमत नाही. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात मोकळ्या जागेत काही वेळ आनंदात घालवण्यासाठी शहरवासीय येत असतील आणि त्यांना असा धोका संभवत असेल तर मग फिरणेच कठीण होऊन बसेल, अशी खंत एका निसर्गप्रेमीने बोलून दाखवली.
नवी मुंबईतील विशेष करून कर्मवीर भाऊराव पाटील, झुनझुनवाला महाविद्यालय, जे.व्ही.एम. मेहता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशिवाय राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचाही या बेफाम बाइकस्वारांच्यामध्ये समावेश असल्याचे एका महाविद्यालयाच्या सुरक्षारक्षकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा