नवी मुंबई महानगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील १८ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. यात ऐरोली, दिघा, घणसोली, कोपरखरणे, नेरुळ आणि सीबीडी बेलापूर येथील मलनि:सारण व्यवस्थेच्या देखभाल दुरुस्ती आणि सेक्टर १२ येथील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बांधलेल्या १९ एमएलडी क्षमतेच्या मलप्रक्रिया केंद्राची देखभाल तसेच शीळ आणि नेरुळ एम.बी.आर. येथील जलउदंचन केंद्राची देखभाल -दुरुस्तीच्या कामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. या वेळी स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवक शिवराम पाटील यांनी ‘सीआरझेड’च्या जागेवर बांधलेल्या इमारतींना पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. मोरबे धरणात पाण्याच्या साठय़ावर गेल्या वर्षी झालेल्या अपुऱ्या पावसाचा परिणाम झाल्याचे या वेळी सांगण्यात आले. जलविभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांनी २०१५मध्ये धरण क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने कमी साठा असल्याचे सांगितले. पुरेसा पाऊस होईपर्यंत पाणीकपात सुरूच राहील, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश स्थायी समितीच्या सभापती नेत्रा शिर्के यांनी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांना दिले.

Story img Loader