पनवेल: अखेर मागील १४ वर्षांपासूनचा रखडलेला नवी मुंबई मेट्रो रेल्वेच्या ११ स्थानकांमध्ये प्रवाशांच्या स्वागतासाठी महा मेट्रो कंपनीने नवी मुंबई मेट्रोमध्ये आपले स्वागत असल्याची उदघोषणा केल्यानंतर पेणधर ते बेलापूर या प्रवासाला शुक्रवारी दुपारी सूरुवात झाली. मेट्रोच्या पहिल्या फेरीच्या प्रवासात निवडक सामान्य प्रवासी होते. महा मेट्रो प्रशासनाने पहिल्या तिकीट काढणा-या प्रवाशांसाठी गुलाबाचे पुष्प देऊन स्वागत केले. गारेगार प्रवास सूरु झाल्यानंतर उत्साहाने संचारलेल्या प्रवाशांनी सिडको, मुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले. अनेकांनी हातामध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छांचे फलक आणले होते. पहिल्या फेरीत सिडको मंडळाने चार स्थानकातून रेल्वे धावण्याचा निर्णय अचानक घेतला. त्यामुळे पेणधर स्थानकासोबत बेलापूर, केंद्रीयविहार आणि सेंट्रलपार्क येथून पहिली मेट्रो धावली. मेट्रोचे पहिले प्रवासी होण्यासाठी अनेकांनी स्थानकाकडे धाव घेतल्यामुळे त्यानंतर एका तासात शेकडो प्रवाशांनी मेट्रोची गारेगार सफरीची आनंद घेतला. मेट्रोच्या ११ स्थानकांच्या रुळावरुन धावणारी गारेगार सफर करताना खारघर वसाहतीमधील समुद्रसपाटीपासून ३० मीटर उंचीवरुन दिसणारे दृष्य प्रवाशांची मने जिंकत होते. खारघरमधील रस्त्यांकडेला असणा-या हिरवीगार वृक्ष, खारघर हिलवरील डोंगररांगा प्रवाशांचे आकर्षण बनले होते. काही मिनिटांत प्रत्येक रेल्वेच्या डब्यात उभे राहून प्रवासी प्रवास करताना दिसत होते. आपणच खारघरच्या राणीचे पहिले साक्षीदार आहोत या आनंदाने अनेकांना सेल्फी व व्हीडीओ काढण्याचा मोह आवरता आला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो रेल्वेचे उदघाटन होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक अडचणींमुळे हा उदघाटन सोहळा पुढे ढकलण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी हा मेट्रो मार्ग कोणत्याही उदघाटन सोहळ्याशिवाय सामान्यांच्या सेवेत सूरु करण्याचा आदेश दिल्यानंतर काही तासांत सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गिकर यांनी तातडीने ही सेवा सूरु केली. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे, मंगेश रानवडे यांच्यासह अनेक पदाधिका-यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत करत हातामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या छायाचित्राचे फलक घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या अभिवादन दिवसाला दिलेली नवी मुंबईकरांना दिलेले मोठे बक्षीस असल्याचे सांगीतले. चंद्रकांत नवथळे हे पत्नी रजनी आणि नातू विहांगसोबत खास मेट्रो सफर करण्यासाठी पेणधर स्थानकात आले होते. ते राहण्यासाठी खारघर वसाहतीमधील सेक्टर २७ येथे राहतात. मागील सहा वर्षांपासून राहतात. खूप छान वाटत असून अतिशय आनंदाच्या क्षणाचे साक्षिदार होता आले याचा अत्याआनंद असल्याचे नवथळे दाम्प्त्यानी सांगीतले.
हेही वाचा >>>नवी मुंबई मेट्रो सुरु झाली, उरण लोकल सेवा कधी सुरु होणार?
पेणधर ते बेलापूर या ११ विविध स्थानकांसाठी स्वतंत्र स्टेशन कंट्रोलर आणि व्यवस्थापक महामेट्रो कंपनीने नेमले आहेत. पेणधर स्थानकासाठी महामेट्रो कंपनीने नरेंद्र वासनिक हे व्यवस्थापक नेमले आहेत. प्रत्येक स्थानकात प्रवेशासाठी चार वेगवेगळे प्रवेशव्दार आहेत. प्रत्येक स्थानकाच्या तळमजल्यावरुन पहिल्या मजल्यावरील तिकीटघरापर्यंत येण्यासाठी स्वयंचलित जिने आहेत. तसेच अपंग आणि जेष्ठांसाठी चार वेगवेगळी उदवाहक आहेत. बेलापूर हे स्थानक सर्वाधिक क्षेत्रफळ असलेले स्थानक आहे. तिकीट काढल्यानंतर प्रवाशांना मेटडिटेक्टर यंत्रातून तपासणी झाल्यानंतर सूरक्षा रक्षक तपासणी करणार आहे. त्यानंतर तिकीटासोबत मिळालेले गोल टोकनला स्वयंचलित गेट सिस्टीमने मान्यता दिल्यावर प्रवाशांना वरिल मजल्यावर फलाटावर जाण्यासाठी प्रवेश मिळणार आहे. दूस-या मजल्यावर फलाटामध्ये तीन डब्यांची मेट्रो दर १५ मिनिटांनी तळोजा व खारघर वासियांसाठी धावणार आहे. महाराष्ट्र सूरक्षा बलचे जवान प्रवाशांच्या सोयीसाठी तैनात आहेत.
हेही वाचा >>>राज्य सरकार विमानतळाला दि. बां.चे नाव देण्यासाठी राज्य सरकार गंभीर नाही का ; दशरथ पाटील यांचा सवाल
सर्वाधिक लाभ सामान्य प्रवाशांचा मागील अनेक वर्षे तीन आसनी रिक्षा तसेच इको व्हॅन आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रम सेवेची (एनएनएमटी) बससेवा हे तीनच पर्याय खारघरवासियांसाठी उपलब्ध होते. तळोजा येथील सेक्टर २० ते बेलापूर रेल्वेस्थानक या पल्यासाठी १५० रुपये तीन आसनी रिक्षा भाडे आकारत होत्या. तसेच एनएनएमटीची बससेवा गाडी क्रमांक ४१ व ४३ ही फक्त खारघर स्थानकापर्यंत आणि ५२ क्रमांकाची बस बेलापूर स्थानकापर्यंत जात होती. सकाळी सेक्टर २० येथील आसावरी इमारतीबाहेर प्रवाशांच्या रांगा लागत होत्या. गाडी मिळाली तरी बसायला सीट मिळत नव्हती. पहिल्यापासून शेवटपर्यंतच्या थांब्यापर्यंत बस सकाळच्या वेळेस फुल्ल होत असे. तळोजावासियांचा हा सर्व प्रवास यापुढे गारेगार आणि सूटसुटीत होणार आहे. तळोजा वसाहतीमधील प्रवाशांना फेस १ व २ या दरम्यान प्रवासासाठी ३० ते ४० रुपये लागत होते. मेट्रोने प्रवास केल्यास हा प्रवास अवघा १० रुपयांत होणार आहे.
नवी मुंबई मेट्रोची सफर शुक्रवारपासून सूरु झाल्याने हार्बर मार्गावरील दळणवळणापासून तळोजा वसाहत हे अंतर १५ मिनिटांवर आले आहे. हार्बर ते वसाहत जोडली गेल्यामुळे तळोजासह अप्पर तळोजा परिसरातील बांधकाम व्यवसायाला तेजी येणार आहे. मागील अनेक वर्षांपासून अपुरा पाणीपुरवठा, दळणवळणाचा ठोस पर्याय नसल्यामुळे आणि प्रदूषणामुळे तळोजातील सिडकोची घरे खरेदी करणा-यांची पसंदी अन्य ठिकाणी होत चालली होती. सिडकोच्या गृहनिर्माण सोडतीच्या योजनेमध्ये नवी मुंबई मेट्रो परिचलनामुळे गुंतवणूकदारांची पसंदी वाढेल अशी अपेक्षा आहे.