जयेश सामंत, जगदीश तांडेल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरण : मुंबई महानगर क्षेत्रासह पुणे आणि आसपासच्या परिसरातील उद्योगांना उभारी मिळावी यासाठी उरणलगत असलेल्या करंजा खाडी परिसरात यापुर्वी उभारण्यात आलेल्या मल्टी मॅाडेल लॅाजिस्टिक पार्कचा आणखी १०० एकर जागेत विस्तार करण्याच्या जोरदार हालचाली राज्य सरकारच्या स्तरावर सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्र अैाद्योगिक विकास महामंडळ, मेरीटाईम बोर्ड आणि खासगी विकसकाच्या भागीदारीतून हे बंदर विकसीत करण्यासाठी करंजा खाडीत नवा भराव टाकावा लागणार आहे. गेल्या २० वर्षापासून स्थानिक ग्रामस्थ, मच्छिमार आणि पर्यावरण प्रेमींच्या विरोधामुळे रुतलेल्या या बंदराचा बहुचर्चित विस्ताराला अचानक गती देण्याचा प्रयत्न सुरु झाले आहेत.

उरण येथील जवाहरलाल नेहरु बंदराच्या आसपासच्या परिसरात अैाद्योगिक उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल तसेच उत्पादित मालाच्या दळणवळण आणि साठवणूकीसाठी व्यवस्था उभी करण्यासाठी २००४ ते २००९ या काळात या भागात लाॅजिस्टीक पार्कना मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. साठवणुकीची गोदामे, शीतगृह, मालवाहतूक करणाऱ्या कंपन्यांची कार्यालये, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, निर्यातीसाठीच्या परवानग्या एकाच ठिकाणाहून मिळाव्यात अशी व्यवस्था यानिमीत्ताने उभी केली जावे असेही ठरविण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने मेसर्स करंजा टर्मीनल ॲण्ड लाॅजिस्टिक प्रायव्हेट लिमीटेड (केटीडपीएल) या कंपनीस याच काळात करंजा खाडी येथील २०० एकर जागा भराव करुन बंदर आणि लाॅजिस्टीक पार्कसाठी ३० वर्षाच्या भाडेपट्टा कराराने देण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी करंजा खाडीत मोठा भराव टाकून १०० एकर क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत करंजा बंदर सुरु आहे. मेरी टाईम बोर्डाने केलेल्या करारानुसार या कंपनीला आणखी १०० एकर जागेत बंदर उभारण्याचा पर्याय उपलब्ध असून याठिकाणी मल्टिमॅाडेल लाॅजिस्टिक पार्क उभारण्यासंबंधीच्या हालचाली वेगाने सुरु झाल्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून केवळ कागदावर असलेल्या या प्रकल्पाला गती मिळावी यासाठी महाराष्ट्र अैाद्योगिक विकास महामंडळ आणि मेरीटाईम बोर्डाने अचानक हालचाली सुरु केल्या असून त्यासाठी आवश्यक जागेसाठी खाडीतील भरावासाठी नव्या जागेचा शोध सुरु करण्यात आला आहे.

हेही वाचा… नवी मुंबई : मराठी पाट्या मुद्यावरून मनसे पुन्हा आक्रमक

दोन टप्प्यात विकासाचा प्रयत्न

या नव्या लाॅजिस्टिक बंदरासाठी आवश्यक असणाऱ्या १०० एकर जागेसाठी १५ एकर इतके खाडीतील भरावाचे क्षेत्र यापुर्वीच उपलब्ध आहे. याशिवाय शिवडी-न्हावाशेवा प्रकल्पाकरिता असलेली आणकी २५ एकर जागाही या प्रकल्पासाठी वर्ग करण्यात येणार आहे. हा प्रकल्प राज्यातील एकमेव बंदराभिमुख मल्टिमाॅडेल लाॅजेस्टिक पार्क ठरणार असल्याने मुंबई, भिवंडी, तळोजा, कळंबोली, चाकण, कोल्हापूर या भागातील पूरक अैाद्योगिक क्षेत्रांना त्याचा लाभ होईल असा एमआयडीसीचा दावा आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी आणि पर्यावरणवाद्यांच्या विरोधामुळे कागदावर राहीलेल्या या प्रकल्पाच्या अंमलबाजवणीसाठी एमआयडीसीने पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा… उरणमध्ये डिसेंबरची सुरुवात पाणी कपातीने, एमआयडीसीकडून आठवड्यातील दोन दिवसांची पाणी कपात होणार

प्रकल्पाचा विरोधाची किनार

या भागात यापुर्वी उभारण्यात आलेल्या बंदरासाठी करंजा आणि खोपटे यांना जोडणाऱ्या खाडी मुखावर मातीचा भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलले आहेत, असा पर्यावरण प्रेमींचा दावा आहे. त्याचप्रमाणे खाडी किनाऱ्यावर होणारी मासेमारी ही बंद झाली. ही नुकसानभरपाई मिळावी यासाठी स्थानिक मच्छिमारांनी यापुर्वी अनेक आंदोलने केली आहेत. याशिवाय खाडीत यापुढे कोणताही भराव नको यासाठी मच्छिमार संघटना कमालिच्या आग्रही आहेत. करंजा खाडीतील मुखावर भराव करण्यात आल्याने खोपटे खाडी शेजारील तसेच पलीकडे असलेल्या गावा लगतच्या छोटया खाडीतील मासळीत घट झाली आहे.

हेही वाचा… तळोजात उग्र दर्प

करंजा बंदरातील प्रस्तावित मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क विकसित करण्यासाठी तसेच प्रकल्पाच्या आर्थिक आणि कायदेशीर बाबी तपासून त्याचा अंतिम आराखडा तयार करण्यासाठी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.विपीन शर्मा यांची संचालक मंडळाने नियुक्ती केली आहे. यासंबंधी डाॅ.शर्मा यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करुनही तो होऊ शकला नाही. या प्रकल्पा संदर्भात एमआयडीसीच्या पनवेल येथील उपविभागीय अभियंता डी. सी. थिटे यांच्याशी संपर्क साधला असता या प्रस्तावाची माहिती पनवेल विभागीय कार्यालाकडे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

करंजा टर्मिनलने यापूर्वी समुद्रात केलेल्या भरावामुळे आधीच उरण तालुक्यातील पर्यावरण आणि येथील पारंपरिक मासेमारी व्यवसायावर गंभीर परिणाम झाले आहेत. पुन्हा एकदा याच परिसरातील समुद्रात मातीचा भराव झाल्यास पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात बदल होऊन उरणच्या समुद्र किनाऱ्यावरील शेती पुर्ण नष्ट होईल. – सुधाकर पाटील, मच्छिमारांचे नेते

एमआयडीसीच्या प्रस्तावाची आम्हाला कल्पना नाही. या संदर्भात यापुर्वी एक बैठक झाली आहे. त्यानंतरचा कोणतही प्रस्ताव नाही. यापूर्वी करंजा खाडीत ८० एकरावर भराव करून करंजा बंदर उभारण्यात आले आहे. ते कार्यरत आहे, अशी माहिती मेरी टाईम बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.