सायन-पनवेल महामार्गावर अपघात होणाऱ्या वाहनचालकांसाठी रस्त्यालगत असल्याने उपयोगी ठरणारे वाशी सेक्टर ७ येथील स्टर्लिग व्होकार्ड रुग्णालय बंद करण्याची नोटीस पालिकेच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी रुग्णालय प्रशासनाला दिली. पालिकेकडे योग्य ती कागदपत्रांची पूर्तता न केल्याने अनोंदणीकृत रुग्णालय म्हणून या रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा पालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी हा निर्णय घेतला आहे. या रुग्णालयाच्या जमिनीची मूळ मालकी स्टर्लिग रुग्णालयाकडे असून त्यांनी नोंदणीसाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र न दिल्याने पालिकेला ही कार्यवाही करावी लागल्याचे समजते.
वाशी सेक्टर ७ येथे सर्वात जुने डॉ. कसबेकर यांचे स्टर्लिग रुग्णालय आहे. काही वर्षांपूर्वी या रुग्णालयाचे संचालन व्होकार्ड या मोठी रुग्णालयीन साखळी चालविणाऱ्या वैद्यकीय संस्थेला देण्यात आले. काही दिवसांनी जमिनीचे मूळ मालक व संचालक यांच्यात वाद झाल्याने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने २१ ऑगस्ट २०१४ रोजी रुग्णालय पालिकेकडे नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालय नोंदणीसाठी लागणारी अनेक पुरावे व कागदपत्रे ही मूळ जमीन मालकाच्या संमतीनेच दिली जाणारी आहेत. त्यामुळे व्होकार्ड स्टर्लिग रुग्णालयाने नवीन रुग्णालय नोंदणीसाठी केलेल्या अर्जात स्थानिक संस्था कर विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे हे अनोंदणीकृत रुग्णालय आता चालविणे जनतेच्या आरोग्यास व जीवितास हानिकारक असून जनतेला उपद्रव होण्याची शक्यता लक्षात घेऊन नोटीस मिळाल्यापासून तीस दिवसांत बंद करण्यात यावे, असे पालिकेने कळविले आहे. त्यासाठी बॉम्बे नर्सिग होम रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट १९४९च्या कलम ८( ३)चा आधार घेण्यात आला आहे. रुग्णालयाने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे केलेल्या अपिलावरही अद्याप अंतिम निर्णय न घेतल्याने पालिकेला हा निर्णय घेण्याची आवश्यकता भासल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या रुग्णालयात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांना रुग्णालयाच्या जबाबदारीवर इतरत्र हलविण्यात यावे, असेही या नोटिशीत सांगण्यात आले आहे. त्यामुळे अनोंदणीकृत रुग्णालयात नवीन रुग्णांना प्रवेश देणे बेकायदेशीर ठरणार आहे. तीस दिवसांत हे रुग्णालय बंद करण्यात यावे अन्यथा त्यानंतर पालिका या रुग्णालयाला सील ठोकणार आहे, असे आरोग्य विभागाने दिलेल्या नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे.