उरण : सिडकोच्या बोकडविरा ते शिर्के वसाहत मार्गावरील पथदिवे भर दिवसा सुरू असल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकदा याच मार्गावरील उड्डाणपूलावरील दिवे बंद असल्याने प्रवासी व नागरिकांना अंधारातून धोकादायक प्रवास करावा लागत असतांना दिवसाढवळ्या पथदिवे सुरू ठेवून विजेचा अपव्यय केला जात आहे. उरण मधील द्रोणागिरी नोड परिसराच्या नागरी सुविधा वीज आणि रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सिडको ची आहे.
हेही वाचा : नवी मुंबई : शासकीय कार्यक्रमाचा फलक पडून अनेक गाड्यांचे नुकसान
येथील उरण पनवेल मार्गावरील बोकडविरा ते शिर्के वसाहत या मार्गावर असलेल्या पथदिव्यांची जबाबदारी ही सिडको कडे आहे. मात्र या मार्गावरील पथदिवे अनेकदा बंद असतात त्यामुळे येथील रहिवाशांना अंधारातून मार्गक्रमण करीत ये जा करावे लागत आहे. असे असतांना याच मार्गावरील पथदिवे दिवसा सुरू असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात सिडकोच्या विद्युत विभागाशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.