नवी मुंबई : पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांची बदली करण्यासाठी काही पदाधिकारी पक्षातील वरिष्ठांची मिनतवारी करीत आहेत. आयुक्तांना पुढील महिन्यात दोन वर्षे पूर्ण होत आहेत. सत्ताधारी पक्षाच्या अनेक अनावश्यक प्रस्तावांना विरोध करणारे आयुक्त व सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात सध्या शीतयुद्ध सुरू आहे.
पालिकेतील नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या प्रस्तावांची अंमलबजावणी करण्यात यावी, नगर संचालकांना माघारी पाठविण्यात यावे, पालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना चिक्की कायम ठेवण्यात यावी. नगरसेवकांची कामे होत नाहीत अशा अनेक कारणास्ताव सध्या पालिका आयुक्त व नगरसेवक यांच्यात मतभेद सुरू आहेत. दोन वर्षांपूर्वी माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात अशाच प्रकारे मतभेद निर्माण झाले होते. त्यामुळे नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणला होता, पण तो शासनाने विखंडित केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व बेकायेदशीर बांधकामे दंड आकारून कायम करण्याच्या प्रस्तावाला मुंढे यांनी सुरुंग लावला. त्यामुळे त्यांची दहा महिन्यांत बदली करण्यात आली. ही बदली आपल्यामुळेच झाल्याचे नंतर नगरसेवक सांगत होते. विद्यमान पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी सत्ताधारी राष्ट्रवादीच्या काही प्रस्तावांना विरोध केला आहे. यंदाचे वर्ष हे निवडणुकीचे असून ते परवडणारे नाहीत, असा विचार करून आयुक्तांच्या बदलीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.