नवी मुंबई : ठाणे – नवी मुंबई – पनवेल अर्थात ट्रान्स हार्बर लाईन रेल्वे मार्गावर दिघा हे नवीन रेल्वे स्थानक पूर्ण बनवून तयार आहे. मात्र राजकीय श्रेयवादात याचे उद्घाटन रखडले गेल्याचा दावा केला जातो. त्यामुळे आज (शुक्रवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या ठिकाणी रेल रोको आंदोलन केले. आंदोलन रेल रोको असले तर रबाळे पोलिसांनी चोख बंदोबस्त लावल्याने रेल रोको करता आले नाही. केवळ घोषणा बाजी करीत मनसे कार्यकर्ता निघून गेले.
या बाबत अधिक माहिती देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ऐरोली विधानसभा अध्यक्ष निलेश बाणखिले यांनी सांगितले की, हे स्थानक लवकरात लवकर सुरू करणे आवश्यक आहे, हा संदेश आम्हाला द्यायचा होता. स्थानक पूर्ण तयार असून येथे रेल्वे का थांबत नाही हा अनुत्तरित प्रश्न आहे. आंदोलन केल्यानंतर मध्य रेल्वे कार्यालय छ. शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाऊन निवेदन देण्यात येईल. मात्र याची योग्य ती दखल घेतली नाही तर मनसे स्टाईल जोरदार आंदोलन होईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी अनेक मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा – नवी मुंबई: घणसोलीमध्ये सहा तास वीज गायब, ऐन उकाड्यात नागरीकांना मनस्ताप
दिघा स्टेशन हे ऐरोली ते ठाणे दरम्यान आहे. ऐरोली ते ठाणे हे अंतर सुमारे ९ किलोमीटर आहे. त्यात दिघा परिसरात दोन अडीच लाख वस्ती असून मध्यम आणि गरीब असे दोनच स्तरातील रहिवासी राहतात. त्यामुळे त्यांना स्टेशनवर जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी किमान ३/४ किलोमीटर जावे लागते. त्यामुळे हीच गरज लक्षात घेत अनेक वर्षांच्या मागणीनंतर स्थानक तयार केले गेले आहे. मात्र अनेक महिले उलटले तरी स्टेशन सुरू करण्यात आले नाही. उलट सुसज्ज स्टेशन बेवारस स्थितीत आहे. त्यामुळे लवकरात लवकर कर्मचारी नेमणूक करून लोकलला थांबा द्यावा, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून केली जात आहे.