उरण : घाटकोपर येथील अनधिकृत फलकाच्या दुर्घटनेनंतर शासकीय यंत्रणा जागी झाली आणि राज्यात सर्वत्र अनधिकृत फलकांवर कारवाई सुरू झाली आहे. मात्र सिडकोच्या द्रोणागिरी नोडमधील सर्वात मोठ्या फलकाचा सांगाडा कायम आहे. द्रोणागिरी नोडला जोडणाऱ्या नवीन शेवा पूल चौकात हा फलक उभारण्यात आला आहे. त्यातच पावसाला सुरुवात झाली असून वादळी वाऱ्यामुळे फलक कोसळण्याची शक्यता आहे. मात्र हा फलक न हटविल्याने सिडको दुर्घटनेची वाट पाहते काय असा सवाल उरणच्या नागरिकांकडून केला जात आहे.
शासनाच्या आदेशानुसार सिडकोने उरण ते रेती बंदर परिसरातील रस्त्याकडेला असलेले अनधिकृत फलक हटविले आहेत. त्यातच सिडकोच्या द्रोणागिरी नोडमधील नागरिकांच्या येण्या-जाण्याचा मुख्य मार्ग असलेल्या चौकात उभारण्यात आलेल्या फलकाचे केवळ पत्रे काढण्यात आले आहेत. मात्र फलकाचा सांगाडा जैसे थे आहे. या फलकाशेजारी काही व्यवसाय सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे दुर्घटना घडल्यास अनर्थ ओढवू शकतो.
सिडकोने आपल्या मालकीच्या जाहिरात फलकाच्या स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे संकेत दिले होते. मात्र त्याचे काय झाले याचे उत्तर मिळालेले नाही. उरणमध्ये अनेक ठिकाणी मोठं मोठे अनधिकृत फलक उभारले होते. यामध्ये कांदळवन नष्ट करूनही फलक उभारले होते. या अनधिकृत फलकाकडे सिडकोने मागील अनेक वर्षांपासून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते. मात्र मुंबईतील फलक दुर्घटनेनंतर सिडकोला जाग आली असून उरणमधील अनधिकृत फलकांवर कारवाई सुरू केली आहे.
हेही वाचा – पोलिसांसाठी अटलसेतूवर फक्त निवारा शेड, गस्ती वाहन नसल्याने गैरसोय
प्रकल्पग्रस्तांच्या घरे आणि बांधकामांवर हातोडा मारणाऱ्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून या फलकाला वेगळा न्याय का दिला जात आहे, याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी फलक अनधिकृत असून तो हटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.