नवी मुंबई : नवी मुंबईतील सी वुड्स येथील एका इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थाने पाचव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटना कळताच एनआरआय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या विद्यार्थांचा मृतदेह ताब्यात घेत वैद्यकीय तपासणी साठी पाठवला आहे. आत्महत्याचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही.
सी वुड्स येथील एक इंग्रजी माध्यमाची शाळा नेहमी प्रमाणे सकाळी सात वाजता भरली. सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गात जात होते. तेवढ्यात नववीत शिकणारा एका विद्यार्थ्याने पाचव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. घटना घडताच शाळा प्रशासनाने पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच एनआरआय पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी आले.
मुलाचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठवण्यात आला आहे. हि घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यानुसार आत्महत्या केलेला विद्यार्थी सज्जातील भिंतीवर चढून खाडी उडी मारताना दिसत आहे. त्याने आत्महत्या का केली हे स्पष्ट झालेले नसून त्याचे पालक बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी दिली.