संतोष जाधव
नवी मुंबई- नवी मुंबई महापालिकेत पालिकेच्या सीबीएसई शाळांची सुरवात ४ ऑगस्ट २०१८ पासून झाली. सीवूड्स येथे एक व कोपरखैरणे येथे अशा पालिकेच्या २ सीबीएसई शाळा पालिकेने सुरु केल्या पण अपुऱ्या शिक्षकांअभावी पालिका चालवत असलेल्या सीबीएसई शाळेतील शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे आता नव्याने सुरु होणाऱ्या शैक्षणिक वर्षात पुरेसे शिक्षक मिळणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे संस्थेला चालवायला दिलेल्या शाळेत पुरेसे शिक्षक तर पालिका चालवत असलेल्या कोपरखैरणे येथील शाळेत जवळजवळ १३०० विद्यार्थ्यांना फक्त ५ शिक्षक व एक मुख्याध्यापक अशी स्थिती असून या शाळेत नव्याने पहिलीचे ४ वर्ग वाढणार असल्याने शिक्षकांअभावी शाळाच चालवणे कठीण होणार आहे.
सीवूड्स येथील आकांक्षा संस्था चालवत असलेल्या शाळेत ११२८ मुलांना ५२ शिक्षक व ७ मदतनीस तर कोपरखैरणेत शिक्षकाअभावी फक्त २ ते २.३० तासाची शाळा भरवली जाते. त्यामुळे या शाळेतून काही पालक आपली मुले काढून दुसऱ्या शाळेत घालण्याच्या स्थितीत असल्याचे चित्र आहे. पालिकेच्या कोपरखैरणे येथील शाळेत अपुऱ्या शिक्षकांविना मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा कसा केला जातो याची प्रचिती सीबीएसईच्या कोपरखैरणे शाळेमध्ये पाहायला मिळते. सीबीएसई शाळेचे नवीन शैक्षणिक वर्ष निकालानंतर सुरु झाले होते. परंतू जवळजवळ नर्सरी ते ६ वी पर्यंतचे १३७५ विद्यार्थी असून या शाळेमध्ये फक्त ५ शिक्षक व १ मुख्याध्यापक असे चित्र असून मुलांना शिकवण्यासाठी शाळेत साफसफाई व इतर कामे करण्यासाठी असलेले मदतनीस या मुलांना सांभाळत असल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे आता पुन्हा उन्हाळी सुट्टीनंतर तरी आम्हाला पुरेसे शिक्षक मिळणार का असा प्रश्न पालक विचारु लागले आहेत. शिक्षकांअभावी फक्त २ ते २.३० तासाची शाळा भरवली जाते
राज्यात महापालिकेची सीबीएसई शाळा सुरु करणारी नवी मुंबई महापालिका असा डंका पिटणाऱ्या पालिकेच्या कोपरखैरणे येथील शाळेत चक्क मदतनीसच शिक्षिका बनल्या आहेत तर दुसरीकडे अपुऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांची शाळा घड्याळी पाच ते सहा तासाऐवजी फक्त २ ते २.३० तासांसाठीच भरवली जाते त्यामुळे पालिकांमध्ये प्रचंड असंतोष असून नव्या शैक्षणिक वर्षात तरी आमच्या मुलांना पुरेसे शिक्षक मिळणार का असा प्रश्न पालक विचारु लागले आहेत. आमच्या लहानग्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा पालिका प्रशासन व्यवस्थेमुळेच झाला असल्याचा आरोप संतप्त पालक करु लागले आहेत. राज्यभरातल्या अनेक महापालिका शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत असल्याचे चित्र असताना नवी मुंबई महापालिकेच्या कोपरखैरणे येथील सीबीएसई शाळेत पहिली ते सहावीपर्यंतचे वर्ग असून या शाळेत तब्ब्ल १३०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
महापालिका चालवत असलेल्या या शाळेची व विद्यार्थ्यांची शिक्षकाअभावी फरफट सुरु असताना दुसरीकडे सीवूड्स येथे पालिकेची सीबीएसई शाळा ही खाजगी संस्थेच्याा मदतीने चालवली जात असून या शाळेत शिक्षण व शैक्षणिक दर्जा चांगला आहे. त्यामुळे फक्त पालिका चालवत असलेल्या सीबीएसई शाळेची अत्यंत वाईट अवस्था तर खाजगी संस्थेच्या मदतीने चालवत असलेली शाळा मात्र चांगल्या स्थितीत असा पालिका प्रशासनाचा व व्यवस्थापनाचा दुजाभाव पाहायला मिळत आहे. १३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांसाठी जवळजवळ ३३ तुकड्या आणी फक्त ६ शिक्षक अशी स्थिती आहे. त्यामुळे बालशिक्षण हक्क कायदा आहे तरी कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. एखाद्या प्रकल्पातून आर्थिक मलिदा व राजकीय पोळी भाजण्यासाठी विविध पक्षीय लोकप्रतिनिधी बेंबीच्या देठापासून ओरडत असताना दुसरीकडे कोपरखैरणे येथील सीबीएसईच्या शाळेत पुरेसे शिक्षक मिळतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आम्हाला सातत्याने शिक्षक मिळणार शिक्षक मिळणार असे सांगीतले जाते परंतू आमच्या मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला असून अनेक पालक मुलांना शाळेतून काढण्याचा विचार करत आहेत. पालिकेने शिक्षक दिले तरच बरे होईल नाहीतर गेल्या शैक्षणिक वर्षासारखे आमच्या मुलांचे यंदाही शैक्षणिक नुकसान होण्याची भिती आहे. -रेणूका म्हात्रे, पालक
नाव सीबीएसईचे पण मुलांना शिकवायला शिक्षक नाहीत अशी स्थिती असून आमच्या मुलांचे नुकसान होत आहे. सीवूड्स येथील शाळेत भरपूर शिक्षक व आमच्या शाळेत शिक्षकच नाहीत हे अत्यंत वाईट असून यावर्षी तरी खरेच शिक्षक मिळतील का अशी आम्हाला धास्ती वाटते. प्रत्येक वेळी फक्त आश्वासने दिली जातात. -वंदना गाडेकर, पालक
सीबीएसई व इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी स्वारस्य निविदा मागवण्यात आली होती. त्याला प्रतिसाद मिळाला असून त्यांच्याद्वारे शिक्षक भरती करण्यात येणार आहे.त्यामुळे कोपरखैरणे शाळेतही पुरेसे शिक्षक मिळतील असा पालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. -सुलभा बारघरे, समन्वयक सीबीएसई शाळा, नवी मुंबई
कोपरखैरणे शाळा- विद्यार्थी -१३००, शिक्षक – ६ मदतनीस – ८
सीवूड्स शाळा- विद्यार्थी -१२००, शिक्षक- ५२ मदतनीस- ७