उरण : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विद्यालयातून परसबागा निर्माण करून विद्यार्थ्यांना श्रममूल्य व नवनिर्मितीचे धडे दिले जात आहेत. परसबागेमध्ये चवळी, पालक, मेथी, सांबार, कोबी, टोमॅटो, वांगी, मिरची, कढीपत्ता अशा प्रकारच्या विविध फळभाज्यांची लागवड करण्यात येते. उरण तालुक्यातील १२ जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या परसबागेतून मिळणारा ताजा सेंद्रीय भाजीपाला त्याच शालेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारामधून देण्यात येत आहे.

तीन महिने या परसबागेची योग्य सेंद्रिय खत आणि पाणी देऊन काळजी घेण्यात येत आहे. या परस बागेतून पालक, मेथी, सांबार, कोबी, मिरची, टोमॅटो इत्यादी भाजी घेऊन त्याचा उपयोग माध्यान्ह भोजनामध्ये करण्यात येतो. केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषण सक्ती निर्माण योजनेतर्गत शाळांमध्ये परसबागा निर्माण करून यातील उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश देशातील शाळांना दिले होते. त्यानुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

उरण तालुक्यातील मोठीजुई, आवरे, नागाव, केगाव, वशेणी, डाऊरनगर, नवीनशेवे, खोपटे, भेंडखळ, पागोटे, बिंधणे आणि मुळेखंड येथिल जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये माझी शाळा माझी परसबाग हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘माझी शाळा, माझी परसबाग’ या उपक्रमांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना कार्यानुभवाचे विशेष धडे मिळावेत त्यांच्यात श्रममूल्याचा विकास व्हावा आणि सेंद्रिय शेती तसेच रासायनिक शेती नफा आणि तोटा या अनुषंगाने विद्याथ्यांचे अध्ययन व्हावे, याकरिता शालेय परिसरामध्ये या परसबागा फुलविण्यात आल्या आहेत.

यामुळे विद्यार्थ्यांना स्वनिर्मितीचा आनंद तसेच स्वतः कमावलेल्या भाज्यांची आवड निर्माण होत आहे. शेतीबद्दल प्रेम आणि जिव्हाळा निर्माण झाला आहे. विद्यार्थी जिव्हाळ्याने परस बागेत काम करतात. विद्यार्थ्यांचे वयोगट विचारात घेऊन ही परसबाग सजवली जाते.

या उपक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्र, एनजीओ, सेंद्रीय शेती करणारे पालक, शेतकरी व कृषी तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन घेतले जाते. या परसबागेतील उत्पादित ताजा भाजीपाला शालेय पोषण आहारातून विद्यार्थ्यांना दिला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्नातून पौष्टिक घटक मिळत आहेत. – प्रियंका पाटील, गटशिक्षणाधिकारी, उरण