महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवीची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि इयत्ता आठवीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये यावर्षी नवी मुंबई महानगरपालिकेच्या ६० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती संपादन करीत घवघवीत यश प्राप्त केलेले आहे.
हेही वाचा- हेवी डिपॉजिटवर घर घेताय? सावधान… थेट मालाकांशीच करा करार अन्यथा…
यंदा ३१ जुलै २०२२ रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये महानगरपालिकेच्या शाळांतून इयत्ता पाचवीचे ५०९ व इयत्ता आठवीचे ४५३ असे एकूण १०६२ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेकरिता प्रविष्ट झाले होते. त्यामधून इयत्ता पाचवीच्या ४९ व इयत्ता आठवीच्या ११ विद्यार्थ्यांनी गुणवत्तेनुसार शिष्यवृत्ती पटकावित नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेचा उंचावलेला स्तर सिध्द केला आहे. या गुणवत्ता यादीत झळकलेल्या विदयार्थ्यांकरिता शिक्षण विभागामार्फत अभ्यास सहल आयोजित करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी महानगरपालिकेच्या वतीने प्रति विद्यार्थी ६००रुपये प्रतिमहा प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
यावर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या तसेच खाजगी शाळांतील पाचवीचे १७९३ व आठवीचे १४५९ असे एकूण ३२५२ विद्यार्थी नवी मुंबईतून शिष्यवृत्ती परीक्षेस बसले होते. त्यामध्ये महानगरपालिकेच्या शाळांतून इयत्ता पाचवीचे ५०९ व इयत्ता आठवीचे ४५३ असे एकूण १०६२ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेकरिता प्रविष्ट झाले होते. त्यात नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील इयत्ता पाचवीच्या ४९ व इयत्ता आठवीच्या ११ अशा एकूण ६० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केलेली असून त्यामध्ये नमुंमपा शाळा क्रमांक ४२, घणसोली येथील सर्वाधिक म्हणजे इयत्ता पाचवीचे २४ व इयत्ता आठवीचे ८ असे एकूण ३२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.