प्रस्ताव मंजूर होऊनही अद्याप अर्जवाटप नाही

पूनम धनावडे, नवी मुंबई</strong>

नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर होऊनही दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती देण्यात आलेली नाही. प्रशासनाकडून प्रस्ताव मंजूर झाल्याचे इतिवृत्त अद्याप न आल्याने योजनेला सुरुवात केली नसल्याची माहिती समाजविकास विभागाने दिली.

मागील वर्षी जुलैमध्ये शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज वाटप करण्यात आले, तर ३१ डिसेंबर २०१८ ही पात्र लाभधारकांना अर्ज भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र यंदा शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज वाटप प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही.

नवी मुंबई शहरातील इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत म्हणून पालिकेच्या वतीने शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. काही वर्षांपासून अर्जामध्ये वाढ होत आहे. आर्थिक निकष शिथिल केल्याने लाभार्थ्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे.

२०१८ मध्ये २८ हजार ३५७ विद्यार्थी पात्र झाले होते. यासाठी एकूण १९ कोटी रुपये खर्च झाला होता. शिष्यवृत्तीच्या रकमेत दुपटीने वाढ झाल्याने योजना बारगळली होती. तर यंदा अद्यापही अर्जाचे वाटप करण्यात आलेले नाही.

शिष्यवृत्ती योजना कोणासाठी?

योजनेत विधवा, घटस्फोटित महिलांची मुले तसेच निराधार मुले, आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील मुले, मागासवर्गीय मुले, प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील मुले, पालिका आस्थापनांवरील सफाई कामगार, कंत्राटी कामगारांची मुले, नवी मुंबई कार्यक्षेत्रातील दगडखाण, बांधकाम, रेती, नाका कामगारांची मुले या योजनेत पात्र ठरणार आहेत. इयत्ता पहिली ते चौथीसाठी ४ हजार, इयत्ता पाचवी ते सातवीसाठी सहा हजार आणि इयत्ता आठवी ते दहावीसाठी आठ हजार रकमेची शिष्यवृत्ती देण्यात येते.

नोव्हेंबर महिन्यात शिष्यवृत्ती प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे. याबाबतचे इतिवृत्त समाज विभागाकडे आले नसल्याने सुरू करण्यात आले आहे. हे इतिवृत्त मिळताच लवकरच अर्ज वाटपाला सुरुवात करण्यात येईल.

क्रांती पाटील, उपायुक्त, समाज विकास विभाग, मनपा

Story img Loader