पनवेल : राज्यातील पहिली जीओ टू ५ जी सक्षम शाळेचा मान पनवेल महापालिकेच्या पोदी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक ८ ला मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रिलायन्स जीओ कंपनीचे मुंबई क्षेत्राचे प्रमुख पंकज थापलिया, पालिका आयुक्त गणेश देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर आणि इतर अधिकाऱ्यांसह पनवेल येथील पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी याच सेवेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्राला फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मदत होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला, इंटरनेटला मिळणाऱ्या गतीचा लाभ विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी करावा, गेम आणि सिनेमे डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेटचा वापर करू नये असेही विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांनी बजावले. ५ जी नेटवर्कच्या राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. नवीन तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल दृश्यांच्या माध्यमातून विषय समजण्यास अधिक सोपे होईल असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी पनवेलमध्ये दि.बा.पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. दि. बा. पाटील यांचे पुत्र अतुल व कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या संघटनेने रायगड, ठाणे जिल्ह्यांत मोठय़ा प्रमाणात आंदोलन उभे केले होते.