पहिलीपासूनचे वर्ग आजपासून; वेळेचा निर्णय मुख्याद्यापकांवर
नवी मुंबई : करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणू संसर्गाची परिस्थिती आटोक्यात असल्यामुळे १५ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. बुधवारपासून पहिलीपासूनचे सर्व वर्ग सुरू होणार आहेत. करोनामुळे गेली दीड वर्षे शाळा बंद होत्या.
शाळा सुरू होणार असल्या तरी पूर्वीप्रमाणे वर्ग भरणार नाहीत. याबाबत पालिका आयुक्तांनी काढलेल्या पत्रकात शाळा किती वेळ व आठवडय़ातून किती दिवस भरवावी याबाबत मुख्याध्यापकांना निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. यानुसार प्राथमिक शाळांचे वर्ग हे साधारण आठवडय़ातून दोन ते तीन दिवस व तीन तासच भरण्याची शक्यता आहे. तसेच मुलांना शाळेत पाठवणे बंधनकारक नसून पालकांनी संमतीनेच मुलांना शाळेत पाठवावे. यासाठी शाळांनी पालकांकडून संमतीपत्र घ्यावे असे पत्रकात म्हंटले आहे. तसेच काही तास ऑनलाइन वर्गही सुरू ठेवण्यात येणार आहेत.
खासगी शाळांमध्ये ऑनलाइन परीक्षा सुरू आहेत, तर खासगी शाळांना काही दिवसातच नाताळची सुट्टी लागणार आहे. त्यामुळे खासगी शाळा पूर्ण क्षमतेने नव्या वर्षांतच सुरू होतील असे चित्र आहे.
आनंददायी गोष्ट
शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे शाळा प्रशासन तसेच पालक व विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे. १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याने मुले नाराज झाली होती. पुन्हा एकदा नव्या जोशाने शिक्षणाला सुरुवात झाली आहे, ही आनंददायी गोष्ट असल्याचे पुणे विद्यार्थीगृहाचे संचालक दिनेश मिसाळ यांनी सांगितले. तर अंतरा शिर्के या विद्यार्थिनीने आंम्ही वाट पाहत होतो असे सांगत वर्गात बसून शिक्षणाचा आंनद घेण्याची इच्छा व्यक्त केली.
आठवडय़ातून दोन दिवस तीनतास शाळा
शाळा किती वेळ व दिवस सुरू ठेवाव्यात याबाबत मुख्याध्यापकांनी निर्णय घ्यावे असे सांगितले आहे. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेच्या ‘सीबीएसई’च्या शाळेने तीन गट केलेअसून प्रत्येक विद्यार्थ्यांला आठवडय़ातून दोन दिवस तीन तास प्रत्यक्ष वर्गात शिक्षण घेता येणार आहे, तर दररोज एक तास ऑनलाइन वर्ग सुरू राहणार आहेत.
करोना काळामध्ये जवळजवळ दीड वर्षांहून अधिक काळ विद्यार्थी शाळांपासून दूर होते. त्यामुळे पालकांकडून शाळा सुरू करण्याची मागणी केली जात होती. तसेच विद्यार्थीही शाळेत जाण्यासाठी उत्सुक होते. करोनाची नियमावली पाळून बुधवारपासून पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्यात येत आहेत. शाळा प्रशासन आणि पालकांनी करोना नियमावली पाळून पालिकेला सहकार्य करावे.
अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका