नामकरणाचा वादामुळे रखडलेल्या मार्गाचा स्थानिकांकडून वापर
नवी मुंबई : पामबीच मार्गावरील करावे भुयारी मार्ग पूर्ण झाला असून तो नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. या ठिकाणी रस्ता ओलांडताना आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पालिकेने हा भुयारी मार्ग तयार केला आहे.
करावे गावात आजही शेकडो कुटुंबं मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करतात. गावातून खाडीकिनारी मासेमारीसाठी जाण्यासाठी पामबीच रस्ता ओलांडणे हा एकमेव पर्याय होता. पामबीच मार्गाला समांतर रस्ता आहे. परंतु त्या रस्त्याने जाऊन पामबीच ओलांडण्यासाठी बेलापूरच्या दिशेला असलेल्या अक्षर चौकातील सिग्नलवरून किंवा वाशीकडील करावे सिग्नलपर्यंत जात रस्ता ओलांडावा लागत होता. त्यामुळे नागरिक खाडीकिनारी बामनदेव मार्गाकडे जाण्यासाठी ‘शॉर्टकट’चा वापर करीत होते. मात्र या रस्त्यावर नवी मुंबईत सर्वात वेगवान वाहतूक सुरू असते. त्यामुळे हा रस्ता ओलांडणे धोकादायक होत होते. आतापर्यत येथून रस्ता ओलांडताना आतापर्यत १३ जणांचा अपघातात मृत्यू झाला होता. असे असतानाही हे ग्रामस्थ रोज मरण डोळ्यांसमोर दिसत असताना पोटाची खळगी भरण्यासाठी रस्ता ओलांडत होते. या ठिकाणाहून पामबीच मार्ग ओलांडण्यासाठी ठेवलेल्या जागेतून दुचाकीधारकही जात होते.
दोन वर्षांपर्वी वृद्ध महिलेचा रस्ता ओलांडताना मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांनी येथे रास्ता रोको केला होता. पादचारी भुयारी मार्गाची मागणी करण्यात आली होती. आठ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर हा भुयारी मार्ग पूर्ण झाला. तरीही तेथील अडचण संपत नव्हती. भरती आल्यानंतर या मार्गात पाणी साचत असल्याने तो अडचणीच ठरत होता. पाण्याच निचरा करण्याचे नियोजनही पालिकेने केले असल्याने आता या मार्गाचा वापर सुरू करण्यात आला आहे.
यामुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यामुळे मासेमारी करणाऱ्यांना दिलासा मिळाल्याचे ग्रामस्थ अमित मढवी, वकील राहुल तावडे यांनी सांगितले.
स्मृती फलकही लावणार
भुयारी मार्गाचा वापर सुरू केला आहे. तर पालिकेने पामबीच मार्गावर ‘शॉर्टकट’ बंद करण्याचे काम सुरू केले आहे. याच भुयारी मार्गाला बामणदेव भुयारी मार्ग असे नाव देण्यात येणार असून यासाठी रस्ता ओलांडताना मृत्युमुखी पडलेल्यांचा स्मृती फलकही लावण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.