हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने सिडको सोडतीतील भाग्यवंतांचा जल्लोष

गेली अनेक वर्षे अर्ज करूनही आलेल्या अपयशानंतर आज अचानक एकाच फटक्यात लागलेली तीन घरांची लॉटरी आणि सहा वर्षांच्या प्रयत्नांना मिळालेल्या यशाचा जल्लोष.. सिडकोच्या १४ हजार घरांच्या मंगळवारी झालेल्या सोडतीची ही क्षणचित्रे उपस्थितांना भारावून सोडणारी होती.

आयुष्यभराची कमाई सार्थकी लावून हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती करण्यासाठी सिडकोच्या १४,८३८ घरांसाठी अर्ज करणाऱ्या दोन लाख अर्जदारांच्या नजरा मंगळवारी दिवसभर सिडको भवनकडे खिळल्या होत्या.  सोडत असल्याने सकाळपासूनच सिडको कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी होती. या गर्दीला आवरण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. घर मिळेल की नाही? या आशेने गर्दी जमलेली असल्याने सिडको अधिकारी आणि पोलीसही त्यांची समजूत काढत मार्गदर्शन करीत होते.

पहिल्या नोडमधील भाग्यवंत स्क्रीनवर नावे जाहीर होताच गर्दीतून एस, ‘आय अ‍ॅम विनर’ असा आवाज आला. हा आवाज होता प्रवीण गजभिव याचा. तळोजाच्या सोडतमध्ये त्यांचा क्रमांक लागल्याचे समोरच्या स्क्रीनवर येताच त्यांना आनंदाश्रू रोखता आले नाहीत. या वेळेचा पहिलाच सदनिकाधारक असल्याने सर्वानी टाळ्या वाजवत त्यांचे अभिनंदन केले तर सिडको अधिकाऱ्यांनी त्यांच्या कागदपत्रांची शहानिशा करीत त्यांचा सत्कारही केला. त्यानंतर आनंदाश्रू आणि जल्लोषाचे क्षण येतच राहिले.

सोडत सकाळी ११ वाजता सिडको सभागृहात होती. बाहेरगावचे अर्जदार सकाळपासूनच सिडकोच्या प्रवेशद्वारावर उभे होते. या सोडतीत पहिल्याच प्रयत्नात सदनिका लागल्याचा अनुभव काही जणांना आला तर अनेकांना सातव्या आठव्या प्रयत्नात यश आल्याचा अनुभव होता. एक कुटुंब आठ वर्ष म्हाडा आणि सिडकोच्या सोडतीत प्रयत्न करीत होत, मात्र सातत्याने अपयश येत होते. मात्र त्यांना या सोडतीत दोन बंधू आणि वडीलांना सदनिका लागल्या.

माजी सनदी अधिकारी उपलोकायुक्त सुरेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय पर्यवेक्षण समिती स्थापन करण्यात आली होती. यात एनआयसी मुंबईचे मोईस हुसेन, म्हाडाच्या अधिकारी सविता बोडके, सिडकोचे लक्ष्मीकांत डावरे यांचाही समावेश होता.

तळोजा येथे आसावरी, केंदार, मारवा, धनश्री या नावाची संकुले तयार होत आहेत. तर खारघरमध्ये बागेश्री, कळंबोलीमध्ये हंसध्वनी घणसोलीत मालंकस, मेघमल्हार, तर द्रोणागिरीतील संकुलांना भैरवी, भूपाळी, आणि मल्हार अशी नावे देण्यात आलेली आहेत.

घर न मिळालेल्या ग्राहकांची अनामत रक्कम येत्या १५ दिवसात परत केली जाणार असून ज्या भाग्यवंतांना घरे मिळाली आहेत त्यांच्यासाठी बँकांची मार्गदर्शन शिबिरे लावली जाणार आहेत.

मी नेव्ही कर्मचारी असून खूप दिवसांचे आणि सर्वात मोठे स्वप्न आज पूर्ण झाले. मला घर मिळणारच या विश्वासाने आम्ही नवरा-बायको दोघेही येथे आलो होतो. सातव्या प्रयत्नात हे यश मिळाले.

-देवेंद्र आणि गीता गजरे, विजेते

मी स्वत: माझा भाऊ  विकास आणि वडील यशवंत पोटे तिघेही अनेक वर्षांपासून म्हाडा आणि सिडकोला अर्ज भरून कंटाळलो होतो. मात्र महागाईमुळे आम्हाला खाजगी घर घेणे शक्य नव्हते. आणखी एक प्रयत्न म्हणून अर्ज भरले आणि तिघांनाही लॉटरी लागली.

-अशोक पोटे, विजेते

मी चर्चमध्ये काम करतो. सहा वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. मात्र यावेळी यश आले. ही बातमी मी कुटुंबीयांना सांगितली. आम्ही आज सर्वात जास्त आनंदी आहोत.

-प्रवीण गजभिव, सोडतीतील पहिले विजेते