नवी मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने मंगळवारी अचानक आ. मंदा म्हात्रे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय नवी मुंबई पोलिसांनी घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. आ. म्हात्रे यांना सध्या एका शस्त्रधारी पोलिसाचे संरक्षण आहे. मंगळवारी दुपारपासून त्यांच्या सुरक्षेसाठी एक पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी आणि अन्य तीन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी मंगळवारी दिवसभर चंद्रशेखर बावनकुळे ठाणे आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर होते. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर शहरातील मुख्य बाजारपेठेत त्यांनी व्यापारी, ग्राहकांच्या भेटीगाठी घेतल्या आणि दुपारनंतर ते नवी मुंबईच्या दिशेने निघाले. ऐरोली येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आल्यानंतर वाशी येथे त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा… उरण शहरातील अनधिकृत व्यावसायिकांवर नगर परिषदेची कारवाई, काही मिनिटांतच रस्ते झाले मोकळे
ऐरोली मतदारसंघाचे आ. गणेश नाईक यांचे पुत्र संदीप यांच्याकडे भाजपचे जिल्हाध्यक्षपद सोपविण्यात आल्यानंतर बावनकुळे यांचा नवी मुंबईत पहिलाच दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे नाईक कुटुंबीयांकडून जोरदार शक्तिप्रदर्शनाची आखणी करण्यात आली होती. ठाणे-बेलापूर मार्गावर जागोजागी बावनकुळे यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते. त्यावर संदीप नाईक आणि माजी खासदार संजीव यांची छायाचित्रे प्रकर्षाने लावण्यात आली होती. दरम्यान, बावनकुळे यांच्या दौऱ्यातील पहिल्या टप्प्यात आ. मंदा म्हात्रे कुठे दिसल्याच नाहीत. ऐरोली विधानसभा क्षेत्रात त्यांनी जाणीवपूर्वक येणे टाळल्याची चर्चाही यानिमित्ताने रंगली होती. मात्र बावनकुळे यांचा बेलापूर मतदारसंघात वाशी येथून प्रवेश होताच आ. म्हात्रे त्यांच्या समर्थकांसह या दौऱ्यात सहभागी झाल्या.
म्हात्रेंचे बॅनर फाडले?
बावनकुळे यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शहरभर नाईक कुटुंबीयांकडून बॅनर उभारणी करून वातावरण निर्मिती करण्यात आली होती. बेलापूर मतदारसंघात काही तुरळक अपवाद वगळले तर आ. म्हात्रे यांचे फलक मात्र फारसे दिसत नव्हते. सकाळच्या सुमारास वाशीत काही ठिकाणी म्हात्रे यांची छायाचित्रे असलेले बॅनर फाडल्याची चर्चा सुरू झाली होती. आ. म्हात्रे यांनी याप्रकरणी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, दुपारच्या बावनकुळे यांच्या दौऱ्यात तसेच चौक सभेच्या निमित्ताने म्हात्रे यांच्या संरक्षणात अचानक वाढ करण्यात आल्याने यानिमित्ताने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. हे संरक्षण नेमके कशासाठी वाढविले गेले याविषयी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत कमालीची गुप्तता पाळली जात होती.
बावनकुळे यांच्या दौऱ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमात मोठी गर्दी असल्याने आ. मंदा म्हात्रे यांच्या संरक्षणात वाढ करण्यात आली होती. यामागे दुसरे कोणतेही कारण नाही. – विवेक पानसरे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १
सकाळपासून अचानक माझ्या संरक्षणात वाढ केली गेली. रात्रीपर्यंत हे कर्मचारी माझ्यासोबत होते. रात्रीनंतर हे संरक्षण काढून घेण्यात आले. यासंबंधीचे कारण मला सांगण्यात आलेले नाही. – मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर