पनवेल मराठा समाजाचे असंख्य समर्थक पुणे लोनावळा येथून निघून काही तासांत जुन्या पुणे मुंबई मार्गावरुन पनवेलमध्ये दाखल होणार आहेत. हजारो मोटारी त्यांमध्ये लाखो मराठा समाजाचे समर्थक यांच्यासाठी पाच लाखजण जेवतील तसेच आठ ते १० लाख बाटलीबंद पाण्याचे वाटपासाठी रायगड आणि पनवेलच्या समर्थकांनी ही सोय केली आहे. प्रत्येक समर्थकाने प्रेमाची शिदोरी आणि पिण्यासाठी पनवेलचे पाणी घेऊन मार्गस्थ होण्याचे आवाहन मराठा समाज समन्वयकांनी केले आहे. आयोजकांच्या आवाहनानंतर गुरुवारी सकाळपासून कामोठे येथे मंडपात जेवून काही समर्थक मार्गस्थ झाले. तर काहींनी दुपारीच जेवणाची शिदोरी घेऊन पुढील प्रवासासाठी निघाले. पोलीसांनी पनवेलमध्ये ६०० हून अधिक पोलीस बंदोबस्त जुन्या पनवेल महामार्गावरुन गव्हाणफाटा तसेच उलवे या मार्गावर लावला आहे.
हेही वाचा >>> Maratha Aarakshan Morcha : जेवण तयार होत आहे .. मराठा आंदोलक नवी मुंबईत संध्याकाळपर्यंत धडकण्याची शक्यता
मागील आठवडाभरापासून पनवेलमधील मराठा समाजाच्या विविध गावांमध्ये तसेच शहरीभागांमध्ये बैठकांचे नियोजन सूरु आहे. मुंबईकडे मार्गस्थ होणारे मराठा समर्थकांच्या जेवणासाठीचे हे नियोजन करण्यात आले आहे. कामोठे येथे तीन ठिकाणी कळंबोलीत दोन ठिकाणी आणि करंजाडे, खांदेश्वर वसाहतीमध्ये एका ठिकाणी जेवण बनवून ते पाकीटात बांधण्याचे काम सूरु होते. लोणावळा येथील सभा दुपारी एक वाजता संपल्यानंतर काही तासांत मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधव पनवेलकडे येण्यासाठी निघाले आहेत. दुपारी जरांगे पाटील यांचे समर्थक जुन्या पुणे खोपोली महामार्गावरुन पनवेलमधील शेडुंग टोलनाक्यावरुन पळस्पे जंक्शनवर येतील. त्यानंतर ते डी पॉईंटवरुन थेट गव्हाणफाटा मार्गे उलवे आणि नवी मुंबईत जाणार आहेत. सूमारे १५ ते २० किलोमीटरच्या प्रवासात एकही अवजड वाहने येऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. जोपर्यंत मराठा बांधवांचा ताफा नवी मुंबईकडे जात नाही तोपर्यंत अवजड वाहने काही काळ या मार्गावरुन धावू शकणार नाहीत. मराठा बांधवांसाठी जुन्या पुणे मुंबई महामार्गावरुन जाण्याचा मार्ग राखीव ठेवला असला तरी अनेक मोटारीने समर्थक कामोठे, खांदेश्वर आणि कळंबोली या वसाहतींमध्ये सकाळीच दाखल झाले. यांनी कामोठे येथून जेवणाची शिदोरी घेऊन ते मार्गस्थ होताना दिसले.
हेही वाचा >>> Maratha Aarakshan Morcha : मराठा मोर्चा, बाहेर जाताय, तुमच्या शहरात आज वाहतूक बदल नक्की कुठे कसा आणि पर्यायी मार्ग काय आहेत?
६०० पोलीस पनवेलमध्ये विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात केली आहेत. जुन्या पुणे मुंबई महामार्गाने जरांगे पाटील यांचा प्रवास सूरु असल्याने त्यांचा पुढील प्रवास त्याच मार्गाने नवी मुंबईकडे होत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस काळजी घेत आहेत.
पंकज डहाणे, उपायुक्त, पोलीस
कोणताही मराठा समर्थक पनवेलमधून उपाशी जाऊ नये यासाठी मागील आठवडाभरापासून पनवेलचे तमाम मराठा बांधव आणि महिला झटून काम करत आहेत. सूकीभाजी, ठेचा, भाकरी तसेच पुलाव असे पाच लाख जण जेवतील एवढी खाद्यपदार्थाची पाकीटे आणि ८ ते १० लाख पाण्याच्या बाटल्या सर्वांच्या सहका-यांनी जमा करुन वाटप करत आहोत. सर्वांनीच राजकीय महत्वकांक्षा बाजूला सारुन या नियोजनात योगदान दिले आहे. काहीजण तर मागील आठवडाभरापासून सुट्टी घेऊन या नियोजनात स्वताला झोकून दिले आहे. रामदास शेवाळे, समन्वयक, मराठा समाज