लोकसत्ता प्रतिनिधी
पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात मागील तीन वर्षांत ४,३१३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. हे मृत्यू नेमके कोणकोणत्या कारणाने झालेत. नैसर्गिक मृत्यू आणि आपत्तीच्या घटनांच्या व्यतिरिक्त साथरोगामध्ये आणि इतर दुर्धर आजाराने किती जणांचे प्राण गेलेत याचा अभ्यास सध्या पनवेल महापालिकेचे आरोग्य विभाग करत आहे.
यासाठी मागील तीन वर्षांची मृत्यू संख्या आणि मृत्यूची कारणे याविषयाची माहिती संकलित करण्याचे काम पालिकेच्या साथरोग तज्ज्ञ विभागात जोरदार सुरू आहे. यातून मिळणाऱ्या माहितीनंतर कोणकोणत्या प्रभागांमध्ये आणि कोणत्या वयोगटातील व्यक्तींचा मृत्यू व त्या मृत्यूंची कारणे काय यावर अभ्यास करण्यात येईल. पालिकेचे आरोग्य विभाग येऊ घातलेल्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य विभागाला साथरोग निर्मूलनासाठी अधिकचे नियोजन करायचे का याविषयीचे धोरण ठरविणार आहे.
आणखी वाचा-उरणच्या पाणजे पाणथळीवर पक्ष्यांची शाळा
पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये २०२१ मध्ये २०२८ तसेच २०२२ मध्ये १२२९ व्यक्ती आणि २०२३ मध्ये १०५६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये पुरुषांची संख्या २६२३ तसेच महिलांची संख्या १६९० एवढी आहे. पनवेलमधील सर्वाधिक मृत्यू हे अपघात आणि वृद्धापकाळाने होतात की अन्य कारणांमुळे त्याबद्दल आरोग्य विभागाच्या अभ्यास अहवालानंतर स्पष्टता येणार आहे. करोना साथरोगाच्या काळात रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधून पनवेलमध्ये वैद्याकीय उपचारासाठी नागरिक पनवेलमध्ये येत असल्याने येथे मृत्यूची संख्या वाढली होती. मात्र २०२१ ते २०२३ या काळात मृत्यूची संख्या कमी होत चालली आहे.
दरहजारी ८५७ मुलींची संख्या
पनवेल पालिका क्षेत्रात २०२३ मध्ये १०२०७ मुले जन्माला आली. यामध्ये ५४९७ मुले ४७१० मुलींची संख्या नोंदविली गेली आहे. पनवेल पालिका क्षेत्रात टक्केवारीनुसार दर हजारी मुलांमागे ८५७ मुलींची संख्या आहे.
आणखी वाचा-पनवेलमध्ये जेनेरिक औषधे मिळणार
साथरोग निर्मूलनाचा विडा
पनवेलमध्ये साथरोग निर्मूलनाचा विडा पालिकेच्या आरोग्य विभागाने उचलला आहे. त्यासाठी १५ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ९ आरोग्यवर्धिनी उपकेंद्रे आणि दोन आपला दवाखान्यांचे नियोजन करून यापैकी ९० टक्के आरोग्य सुविधा सुरू केल्या. साथरोगामुळे किती नागरिक वर्षाला प्राण गमावतात तसेच ही आपत्ती टळू शकेल का याविषयी तज्ज्ञ मृत्यूंच्या कारणांचा लेखाजोखा तपासत आहेत.
पनवेल पालिकेच्या आरोग्य विभागाला एकूण वर्षभरात तसेच मागील तीन वर्षांत झालेल्या मृत्यूंची माहिती संकलित करून यामध्ये कोणत्या वयोगटात व कोणत्या आजाराने मृत्यूची नोंद झाली याची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. याच आरोग्य सर्वेक्षणामुळे वैद्याकीय धोरण ठरविण्यास मदत मिळेल. डॉ. आनंद गोसावी, वैद्याकीय आरोग्य अधिकारी, पनवेल महापालिका