ठाण्यामध्ये दसऱ्याच्या काही दिवसांनंतर पार पडलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या ‘महाप्रबोधन यात्रे’मध्ये उद्धव ठाकरे समर्थक नेत्यांनी केलेल्या भाषणांवरुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करणे, राष्ट्रपतींचं नाव घेऊन खिल्ली उडवणारं भाष्य करणे यासारखे आरोप सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहेत. त्याचबरोबरच उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारेेविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता सुषमा अंधारे यांनी थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख करत सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीला आव्हान दिलं आहे.
नक्की वाचा >> “माझा भाऊ कॉप्या करुन…”; मुख्यमंत्री शिंदेंचा ‘ढ’ असा उल्लेख करत सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
नवी मुंबईमध्ये गुरुवारी सायंकाळी ‘महाप्रबोधन यात्रे’अंतर्गत उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ठाकरे समर्थक नेते मंडळी मंचावर दिसून आली. यात खासदार राजन विचारे, माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार अरविंद सावंतही उपस्थित होते. याचबरोबर गटाच्या उपनेत्या असणाऱ्या सुषमा अंधारेंनीही कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सर्वच नेत्यांनी भाषणं दिली मात्र त्यातही अंधारे यांनी आपल्या खास शैलीमध्ये दिलेलं भाषण आणि त्यामधून केलेली टोलीबाजीला ठाकरे समर्थकांनी चांगली दाद दिल्याचं पहायला मिळालं.
नक्की वाचा >> “आदित्य ठाकरेंनी तत्काळ अंमलबजावणी करत बदलले पक्षाचे नाव”; मनसेनं शेअर केलेला स्क्रीनशॉट चर्चेत
काही दिवसापूर्वी ठाण्यात झालेल्या कार्यक्रमानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतरही अंधारे यांनी अगदी पूर्वीप्रमाणेच शाब्दिक कोट्या करत सत्ताधारी शिंदे गटाला लक्ष्य केलं. विशेष म्हणजे दाखल झालेल्या गुन्ह्याचा संदर्भ देत त्यांनी थेट राज ठाकरेंचा उल्लेख चुलत भाऊ असा केला आणि त्यांना वेगळा कायदा लागू होतो का असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारला. कायद्यानुसार सर्वांना नियम सारखे हवेत असं असताना राज यांच्या नकलांवरुन कधी गुन्हे दाखल झाले का असा सवाल करत माझ्यासाठीच वेगळा नियम का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
नक्की वाचा >> दीड वर्षांपूर्वीच ठाकरे कुटुंबाला लागलेली शिंदेंच्या बंडाची चाहूल? आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा; म्हणाले, “आमच्या घरात…”
“तुमच्यावर गुन्हा दाखल होईल. आमचे राज दादा. ते आमचे चुलत भाऊ आहेत. एकनाथ भाऊ सख्खे भाऊ आहेत,” असं सुषमा अंधारेंनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. त्यानंतर अंधारे यांनी, “राज दादा आमचे चुलत भाऊ. आमचे राज दादा एवढ्या सगळ्या मिमिक्र्या करतात त्या वेळी काय करता? राज भाऊंवर किती केसेस दाखल केल्या तुम्ही विचारलं पाहिजे,” असं म्हटलं. इतकच नाही तर अगदी इंग्रजीमध्ये अंधारे यांनी, “कायद्यामधील तिसऱ्या कलमातील १४ व्या तरतुदीनुसार कायद्यासमोर समान आहेत,” असं एकदम वकिली थाटात सांगितलं.
कायद्याचासंदर्भ दिल्यानंतर अंधारे यांनी, “मग जो कायदा राज ठाकरेंना लागू आहे तोच मला लागू का होत नाही?” असा प्रश्न विचारला. तसेच पुढे त्यांनी राज्यामधील सत्ताधाऱ्यांना थेट आव्हानही दिलं. “तरीही माझ्यावर गुन्हे दाखल करायचे असतील आणि असे गुन्हे दाखल केल्याने सुषमा अंधारे घाबरेल आणि माघार घेईल असं वाटत असेल तर तुम्ही भ्रमात आहात. जागे व्हा!” असा खोचक सल्ला अंधारे यांनी दिला.