नवी मुंबई गुन्हे शाखेने घरफोडीतील एका आरोपीला अटक केले असून त्याने ज्यांना चोरीचे सोने विकले अशा दोन सोनारांना ताब्यात घेतले आहे. या व्यतिरिक्त अजून काही सोनार पोलिसांच्या रडार वर आहेत. नवी मुंबईत करोना काळांनातर घरफोडी गुन्हयात वाढ झाली आहे. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेने तपास कामी खास पथके तयार केली आहेत. मार्च मध्ये एक आरोपी ऐरोली येथील एका घरफोडी तपास करीत असताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता. मात्र त्याचा छडा लागत नव्हता.

दरम्यान अन्य चार घरफोडीतही हाच आरोपी सीसीटीव्हीत दिसत होता. प्रत्येक वेळी एकटाच दिसत असल्याने पोलिसांनी एकटे घरफोडी करणाऱ्या अभिलेखवरील गुन्हेगारांच्या फायली तपासणे सुरू केल्यावर सदर गुन्हेगाराची ओळख पटली. ओळख पटल्यावर तपासाची दिशा निश्चित झाली तरी आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हता. दोन वेळा त्याचा ठावठिकाणा सापडला मात्र पोलीस पथक पोहोचण्याच्या आधी तो निसटला . आरोपी गुन्हा करताना मोबाईल वापरात नसल्याने तांत्रिक तपास खुंटला होता , सर्व भिस्त खबऱ्यांवर होती . मात्र त्याच्या मागावर असलेल्या पोलीस पथकाने त्याची पाठ सोडली नाही .

हेही वाचा : नवी मुंबई : जल्लोषात २४१ सार्वजनिक व ८३५५ घरगुती गणरायांचे विसर्जन

शोधात सातत्य राखल्याने अखेर तो सहा महिन्यांच्या प्रयत्नांनी पोलिसांच्या हाती लागला . त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १६ तारखे पर्यंत पोलीस कोठडी फर्मावली आहे. आरोपीने मोठ्या प्रमावर घरफोडीत ऐवज चोरी केला आहे. चोरीचे सोने विकतानाही खबरदारी घेत एक दोन एक दोन तोळेच सोने एका वेळी विकत होता. असेच सोने त्याने वेगवेगळ्या अनेक सोनारांना विकल्याचे समोर आले. या पैकी दोन सोनारांचा छडा लागला आहे. त्यांना ताब्यात घेत ४ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

हेही वाचा : एपीएमसीत बटाट्याच्या अवघ्या ४२ गाड्या दाखल ; वाहतूक कोंडीचा फटका

आरोपीच्या घरात तब्बल ४९ तोळे सोन्याचे दागिने आढळून आले आहेत. हा सर्व ऐवज चोरीचा असल्याची कबुली आरोपीने दिली. आरोपीच्या अटकेने १२ गुन्ह्यांची उकल झाली. यातील बहुतांश गुन्हे ऐरोली नोड मधील आहेत. असून त्यात वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून यासाठी त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.