नवी मुंबई : पोलीस उपायुक्त पानसरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केली असून या संदर्भात शिष्टमंडळाने आयुक्त बिपीनकुमार यांची भेट घेतली आहे. तत्पूर्वी नवी मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेच्या विरोधात पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवत दडपशाही सुरु करण्यात आली आहे. असा आरोप करीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने नवी मुंबईत सभा आणि आयुक्तालय वर मोर्चा आयोजित केला होता .

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबईत माजी नगरसेवक मनोहर मढवी यांना तडीपार करण्यात आले, माजी विरोधीपक्ष नेते मनोज हळदणकर यांच्या विरोधात दंगल शांतता भंग करणे आदी कलमान्वये कारवाई करण्यात आली. तसेच दसरा मेळाव्याला जाणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली म्हणून आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. बेलापूरचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांचे हॉटेल उशिरापर्यत सुरु राहिले म्हणून कारवाई करण्यात आली. या शिवाय खासदार राजन विचारे यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली, तर दुसरीकडे मुख्यमंत्री यांच्या स्वीय सहाय्यकाला तीन सुरक्षा पोलीस बहाल करण्यात आले आहेत. तसेच नवी मुंबईतील अनेक शिवसैनिकांवर शिंदे गटात सामील होण्यासाठी पोलिसांच्या मदतीने दबाव टाकणे सुरु असल्याचा आरोप काही दिवसापासून उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. या दबावाच्या विरोधात शिवसेनेने मोर्चाचे आयोजन केले होते. सीबीडी सेक्टर १५ च्या मैदानात पार पडलेल्या या मोर्चात विरोधी पक्षनेता अंबादास दानवे खासदार अरविंद सावंत,राजन विचारे  विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, प्रवक्त्या मनीषा कायंदे स्थानिक जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे व द्वारकानाथ भोईर आदी नेते व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : चंद्रकांत पाटील करणार अजितदादांचा ‘हिशोब’ चुकता

यावेळी अंबादास दानवे यांनी नवी मुंबई पोलीस दलावर ताशेरे ओढत ही शिवसेना दबावाखाली राहणारी नसल्याचा दावा केला. यावेळी दानवे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्यावर टीका करीत उपायुक्त पानसरे यांच्या विषयी बोलताना त्यांची जीभ घसरली व शिवराळ भाषेत त्यांनी पानसरे यांचा उल्लेख केला. तर भास्कर जाधव यांनी त्यांचीही सुरक्षा कमी केली असल्याचे सांगितले. तसेच  त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा प्रकार हा नैराश्यापोटी करण्यात आल्याचे सांगितले. महत्वाच्या व्यक्तीची सुरक्षा काढणे आणि दुय्यम व्यक्तीला अति महत्वाच्या व्यक्ती प्रमाणे सुरक्षा देऊन सरकारला नक्की काय सिद्ध करायचे आहे. असा सवाल राजन विचारे यांनी केला.

हेही वाचा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मोर्चा आणि पोलीस आयुक्तालयाला छावणीचे रूप, नेमकं कुठे घडत आहे ?

पोलीस आयुक्तालयास छावणीचे रूप

पोलीस आयुक्तालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह , अग्निशमन दलाच्या गाड्या, दंगल विरोधी गाडी आणि पथक,तैनात करण्यात आले असून सेवेसाठी रुग्णवाहिका असा मोठा ताफा तैनात करण्यात आला  होता.

 खासदार राजन विचारे विरूद्ध नवी मुंबई पोलीस

आयुक्तांना भेटण्यास खासदार राजन विचारे यांना मज्जाव करण्यात आल्याने आयुक्तालय प्रवेशद्वारावरील बंदोबस्तात असणारे पोलीस आणि विचारे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.  खासदार अरविंद सावंत , विनायक राऊत आमदार भास्कर जाधव यांच्या शिष्टमंडळातील या नेत्यांना आयुक्तांच्या भेटीसाठी आत सोडण्यात आले. मात्र काही वेळाने आलेले खासदार राजन विचारे यांना अडवण्यात आले त्यावरून बंदोबस्तावरील पोलीस आणि विचारे यांच्यात बाचाबाची झाली.  राजरोज तरी दडपशाही करू नका असे पोलिसांना राजन विचारे यांनी सांगितले. हा गोंधळ पाहून काही वरिष्ठ अधिकारी आले व त्यांना तुम्ही जाऊ शकता मात्र तुमच्या सोबत गाडीत जे कार्यकर्ते आहेत ते जाऊ शकणार नाहीत असे सांगण्यात आले मात्र गाडीत नवी मुंबई बेलापूर संघाचे अध्यक्ष विठ्ठल मोरे ऐरोली अध्यक्ष द्वारकानाथ भोईर असल्याची माहिती दिल्यावर आत सोडण्यात आले.

हेही वाचा : खासदार राजन विचारे यांची नवी मुंबई पोलिसांसोबत झाली जोरदार बाचाबाची

परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आयुक्त बिपीनकुमार सिग यांच्याकडे केली. यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन  देण्यात आले आहे अशी माहिती शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspend dcp demand shiv sena uddhav balasaheb thackeray group rajan vichare navi mumbai police tmb 01