पनवेल : नवीन पनवेल वसाहतीमधील सेक्टर १९ येथील नील आंगण या सोसायटीमध्ये पाच दिवासांपूर्वी (२३ जून) भिंतीवर ‘पीएफआय झिंदाबाद’ ‘७८६’ अशा संदेशाचे स्टीकर लिहिलेले मिळाले. त्याचसोबत दोन हिरव्या रंगाचे सूतळी बॉम्ब आणि अगरबत्ती सापडली. भितीपोटी या सोसायटीच्या रहिवाशांनी मध्यरात्री खांदेश्वर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविली.
पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या इमारतीमध्ये दहशतवादी कसे येतील असा प्रश्न पहिल्यांदा पोलिसांना पडला. पोलिसांनी या घटनेनंतर दहशतवादी टोळीचा या सूतळी बॉम्बचा काही संबंध आहे का याच्या तपासाला सुरुवात केली. तसेच या सोसायटीतील प्रत्येक सदनिकाधारकांची चौकशी सुरू केली. पाच दिवसांच्या अथक परिश्रमानंतर अखेर या प्रकरणातील संशयित आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. संशयीत आरोपी याच इमारतीमध्ये राहणारा असून त्यांचे वय ६८ वर्षीय आहे. सोसायटी पदाधिकाऱ्यांचे आपसात असणाऱ्या वादातून हे खोडसाळ वृत्त केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी या प्रकरणी भादवी १५३ प्रमाणे अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदविला होता.
हेही वाचा – पनवेल: देहरंग धरणातून पाण्याचा उत्सर्ग सूरु
नील आंगण सोसायटीच्या सदस्यांकडे केलेल्या चौकशीत सोसायटीचे पदाधिकारी आणि सदस्य यांच्यातील अंतर्गत वाद सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच सोसायटीचे एक सदस्य वारंवार पोलीस ठाण्यात येऊन या प्रकरणाचा पाठपुरावा करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांनी त्याच दिवशी नव्याने पदभार घेतला होता. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांडगे यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला पकडायचे असे ठरविले होते. पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे यांच्यासह सर्वच पोलीस अधिकाऱ्यांनी इमारतीमधील आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी मोहीम आणि सदनिकाधारकांचे जबाब घेण्याचे काम सुरू केले. वारंवार सोसायटी सदस्यांचे जबाब घेण्यात आल्याने सोसायटीचे सदस्यसुद्धा हैराण झाले होते. परंतु याच जबाबात प्रत्येकवेळी संशयित आरोपीच्या जबाबात फरक आढळून येत होता. त्यामुळे पोलिसांचा संशय संबंधित व्यक्तीविरोधात बळावला. अखेर ६८ वर्षीय संशयित आरोपीने पोलिसांच्या प्रश्नोत्तराला कंटाळून स्वत: गुन्हा केल्याची कबुली दिली.