लोकसत्ता, प्रतिनिधी
वाशी: गेल्यावर्षी ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अभियानामध्ये देशातील तृतीय आणि राज्यातील सातत्याने प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळविणारे शहर असा नवी मुंबई शहराचा गौरव झाला असताना यंदा नवी मुंबई शहर ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ला ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे ध्येय नजरेसमोर ठेवले आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असून त्यामध्ये नागरिकांच्या सहभागावर भर दिला जात आहे. याशिवाय स्वच्छता विषयक जाणीव वृध्दींगत होण्याकरिता जनजागृतीपर विविध माध्यमांचा उपयोग केला जात आहे.
कलेच्या माध्यमातून स्वच्छता विषयक जाणीवांना नवी झळाळी देण्याच्या दृष्टीने वैष्णो व्हिजन या कलासंस्थेच्या माध्यमातून शुक्रवारी २३ जून रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे सायंकाळी ६.३० वा. मान्यवर साहित्यिक, कलावंतांच्या सहभागाने ‘स्वच्छंद काव्य संगीत संध्या’ आयोजित करण्यात आलेली आहे. गतवर्षी स्वच्छ सर्वेक्षण करिता आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ कवी संमेलन उपक्रमाला नवी मुंबईकर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. नवी मुंबई महानगरपालिकेच्या या स्वच्छता विषयक अभिनव काव्य उपक्रमाची नोंद राज्य व राष्ट्रीय पातळीवर विशेषत्वाने घेण्यात आली होती.
आणखी वाचा-उरणच्या उड्डाणपूलावर पथदिव्याचा भर दिवसा झगमगाट
‘स्वच्छंद काव्य संगीत संध्या’ मध्ये सुप्रसिध्द कवी प्रा. अशोक बागवे, अरुण म्हात्रे, डॉ. महेश केळुसकर यांच्या एकाहून एक सरस कवितांचा आस्वाद रसिकांना घेता येणार असून त्यासोबतच ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या मराठी अभिमान गीताचे संगीतकार कौशल इनामदार यांच्या सुश्राव्य गीत-संगीताचा लाभही मिळणार आहे. नवी मुंबईकर नागरिकांना कवितांचा ऋतू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्जन्य ऋतूमध्ये अर्थात पावसाळी कालावधीत घेता येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिध्द निवेदिका अस्मिता पांडे करणार असून, मुंबई दूरदर्शनचे माजी निर्माते जयू भाटकर यांच्या वैष्णो व्हिजन मार्फत या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे.
नवी मुंबईकर रसिक नागरिकांसाठी नामवंत कवी व संगीतकरांनी सजविलेली ही साहित्य- संगीताची मेजवानी विनामूल्य कार्यक्रमाप्रसंगी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आहे