नवी मुंबई : विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया संपण्यास काही तास राहिले असता स्वराज्य पक्ष आणि भाजप कार्यकर्त्यात हाणामारी झाली आहे. सेक्टर पाच येथील माजी नगरसेवक शंकर मोरे यांच्या कार्यालयासमोर सदर प्रकार घडला असून अद्याप कोणावर अटकेची कारवाई झालेली नाही. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मतदान संपण्यास काही तास राहिले असता भाजपा उमेदवार गणेश नाईक यांचे समर्थक माजी नगरसेवक शंकर मोरे यांच्या कार्यालयातून पैसे वाटप होत असल्याच्या संशयावरून स्वराज पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांचे कार्यकर्ते निवडणूक आयोगाच्या भरारी पथकासह सेक्टर पाच येथील मोरे यांच्या कार्यालयात दाखल झाले. कार्यालय बाहेर टेबल मांडून मतदारांना यादी क्रमांक, बूथ क्रमांक आदींची माहिती दिली जात होती याच ठिकाणी स्वराज पक्ष कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या देखत बाचाबाची करत एकमेकांना भिडले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सुरवातीला बाचाबाची झाली मात्र नंतर अचानक कार्यकर्ते एकमेकांना भिडले. 

हेही वाचा…गावकडील मतदान करावे कसे, पनवेल बस आगारात प्रवाशांची गर्दी 

या बाबत स्वराज पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांना विचारणा केली असता मोरे यांच्या कार्यालयातून पैसे वाटप होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. या माहितीच्या आधारावर भरारी पथकासह आम्ही पोहचलो. त्यात मोरे यांच्या कार्यकर्त्यांशी बोलत असताना माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे हाणामारी झाली. यात मोरे यांच्या मुलाचा समावेश आहे. असे कदम यांनी सांगितले. याबाबत शंकर मोरे यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही . हाणामारी झाल्याचे खरे असून काही जणांना ताब्यात घेतले असून चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swaraj party alleged supporters of bjp candidate ganesh naik distributed money in shankar mores office sud 02