झोपडपट्टीतील पालिका शाळेत शिकणाऱ्या रबाळेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यातील पहिला तरणतलाव सुरू करण्यात आला आहे. उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया सागरी अंतर पार करणाऱ्या वेदांत सावंत आणि राज पाटील यांनी विद्यार्थ्यांना पोहण्याचे धडे दिले.
महापौर सुधाकर सोनावणे यांच्या प्रभागातील पालिका शाळा विकसित करण्यात आली आहे. शिस्तीबरोबरच झोपडपट्टीतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण या सूत्रानुसार व्यवस्थापन केले जात आहे. उत्तम वर्ग, सभागृह, खेळणी आणि उद्यान शाळा परिसरात आहेत. शाळेतील पटसंख्या वाढली आहे. काही विद्यार्थ्यांनी याच शाळेतून प्राथमिक धडे गिरवत वैद्यकीय, अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
शाळेच्या आवारात २० बाय ४० चा तरणतलाव बांधण्यात आला आहे. तलावाभोवती छप्पर आणि संरक्षण जाळी लावण्यात आली आहे. यासाठी ‘अनुसया सोनावणे चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि लोकसहभागातून हा तरणतलाव उभारण्यात आला आहे. पालिकेने शहरातील सध्या तरणतलावांचे पाणी बंद केले आहे. त्यामुळे या तरणतलावात आठ टँकर पाणी बाहेरून आणून टाकले जाणार आहे.
तीन ते सात वयोगटातील दहा विद्यार्थ्यांना पहिल्या तुकडीत सकाळी प्रशिक्षण दिले जाणार असून याच भागात राहणारे विठ्ठल पाटील यांनी या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या लहानग्यांना प्रशिक्षण दिले जाणार असून झोपडपट्टी भागातून भविष्यात निष्णात जलतरणपटू तयार केले जातील, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
उच्चभ्रू लोकवस्तीतील विद्यार्थ्यांना तरणतलावाचे अनेक पर्याय खुले आहेत, पण झोपडपट्टीतील गरीब विद्यार्थ्यांचा कोण विचार करणार आहे? त्यातून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली असून पालिकेच्या सहकार्याने राज्यातील पहिला स्लॅम तरणतलाव बांधण्यात आला आहे. येथील दोन तलावांत मुले तयार झाल्यावर त्यांना ठाणे खाडीत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
– सुधाकर सोनावणे, महापौर, नवी मुंबई</strong>
पालिका शाळांच्या आवारात तयार करण्यात आलेला हा पहिलाच तरणतलाव असून पालिकेने परवानगी दिली आहे. त्याचा खर्च लोकसहभागातून करण्यात आला आहे.
– दादासाहेब चाबूकस्वार, उपायुक्त, नवी मुंबई पालिका