|| संतोष जाधव
नवी मुंबई पालिकेचा एकही तरण तलाव नाही; प्रशिक्षणासाठी अन्य शहरांकडे धाव
नवी मुंबई महापालिकेला गेल्या २५ वर्षांत शहरात एकही स्वतंत्र जलतरण तलाव बनवता आलेला नाही. त्यामुळे शहरात कॉमनवेल्थ गेमसह जलतरणात आशियाई विक्रम स्थापन करणारे जलतरणपटू असताना त्यांना अन्य महानगरपालिकांच्या तलावांत सराव करावा लागत आहे. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली असताना मुलांना जलतरणाचे प्रशिक्षण घेण्यासाठी खासगी तलतरण तलाव आणि जिमखान्यांत जाऊन अधिक प्रशिक्षण घ्यावे लागत आहे, त्याची झळ पालकांच्या खिशाला बसली आहे.
नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत क्रीडाक्षेत्राकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. गेल्या २५ वर्षांत शहरात कुस्तीसाठी एकही आखाडा नव्हता, आता तो बांधण्यात आल्यानंतरही उद्घाटनाविना पडून आहे. जलतरण तलावाबाबतचे धोरण अद्यापही लाल फितीतच अडकून पडले आहे. पालिकेने सामाजिक वापरासाठीचे अनेक भूखंड आजवर सिडकोकडून हस्तांतरित करून घेतले आहेत. जलतरण तलावासाठी वाशी सेक्टर १२ येथील भूखंड क्रमांक १९६ ए पाच वर्षांपूर्वीच पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. हा भूखंड जलतरणासाठी कमी पडत असल्याने एनएमएमटीसाठी दिलेल्या भूखंडातील काही भाग जलतरणासाठी वर्ग करून सुमारे चार हजार चौरस मीटरचा भूखंड जलतरणसाठी घेण्याचे नियोजन करण्यात आहे होते. त्यानंतर पालिकेने जलतरण तलावासाठी २०१० च्याअर्थसंकल्पात यासाठी खर्चाची तरतूदही केली आणि कोटय़वधी रुपयांचा प्रस्तावही मंजूर केला. परंतु त्यानंतरही जलतरण तलाव काही प्रत्यक्षात आलाच नाही.
नवी मुंबई शहरात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, आशियाई आणि कॉमनवेल्थ स्पर्धा खेळलेले आणि विक्रम प्रस्थापित केलेले अनेक जलतरणपटू आहेत. जलतरणात शिवछत्रपती पुरस्कार मिळवलेले खेळाडू व प्रशिक्षकही इथे आहेत. त्यात ज्योत्स्ना पानसरे, विराज प्रभू, शुभम वनमाळी, श्रुतूजा उदेशी, लेखा कामत, अपेक्षा श्री राव, पायल श्री राव यांचा समावेश आहे. ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव नाही.
शहरात टी. एस. चाणक्य, डी. वाय. पाटील, नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब, यंग मिशनरी कॅथलिक असोसिएशन, फादर अॅग्नेल, नेरुळ जिमखाना, नेरुळमधील शैलेश टॉवर या खासगी संस्थांचे जलतरण तलाव आहेत, परंतु पालिकेचा जलतरण तलावच नाही. त्यामुळे उन्हाळी सुट्टीत पालकांना अधिक पैसे भरून मुलांना खासगी जलतरण तलावांत प्रशिक्षणासाठी पाठवावे लागत आहे.
तलाव व परिसर
- भूखंड क्रमांक १९६ ए – ४०४९.८२ चौ.मी. क्षेत्रफळावर इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कम जलतरण तलाव
- भूखंड क्रमांक १९६ – ६५०० चौ.मी. क्षेत्रफळावर परिवहनचे टर्मिनस
मी जलतरणात विविध विक्रम केले आहेत. परंतु नवी मुंबईत महानगरपालिकेने स्वतंत्र जलतरण तलाव बांधलेला नसल्याने सरावासाठी शहराबाहेर जावे लागते. पालिकेने ऑलिम्पिक दर्जाचा तलाव बांधल्यास सरावासाठी खूप उपयोग होईल. – शुभम वनमाळी, जलतरणपटू
वाशीत जलतरण तलावासाठी असलेला भूखंड व परिवहन सेवेसाठी असलेला भूखंड एकत्रित करून तळमजल्यावर परिवहनचे टर्मिनस, पहिल्या मजल्यावर जलतरण तलाव व पुढे व्यावसायिक संकुल उभारण्यात येणार आहे. – डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, नमुंमपा