उरण : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतून घारापुरी बेटावर येणाऱ्या हजारो देशी-परदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी शासकीय यंत्रणेला सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले. शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांच्या तातडीने बोलाविण्यात आलेल्या बैठकीत पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारची हयगय होणार नाही यासाठी उपाययोजना म्हणून सर्वच विभागांनी देशी-विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सज्ज राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावरील असलेल्या जागतिक लेणी पाहण्यासाठी दररोज देश-विदेशातून हजारो पर्यटक येतात. त्यातच ख्रिसमस, थर्टी फर्स्ट व सरत्या वर्षानिमित्त येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांची संख्या दुपटीने वाढते. सणासुदीत बेटावर येणाऱ्या हजारोंच्या संख्येने पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (२३) विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलविण्यास आली होती.
हेही वाचा – पुढील दोन दिवस वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता; थंडीची प्रतिक्षा कायम
मोरा सागरी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय पुरातत्त्व विभागाच्या हॉलमध्ये झालेल्या बैठकीत विविध शासकीय विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते. यामध्ये भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी कैलास शिंदे, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या एलिफंटा विभागाचे उप बंदर निरीक्षक विनायक करंजे, एलिफंटा सिक्युरिटी गार्डचे प्रमुख अजय झा व त्यांचे सहकारी, गेटवे जलवाहतूक संस्थेचे प्रतिनिधी, ग्रामपंचायतीच्या सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकूर व ग्रामस्थ उपस्थित होते.
हेही वाचा – उपचाराअभावी मृत्यू… तेही मुंबईत; वरळीकरांनी उपचारासाठी जायचे कुठे?
ख्रिसमस, थर्टी फर्स्ट व सरत्या वर्षानिमित्त बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांची संख्या दुपटीने वाढते. त्यामुळे सुरक्षायंत्रणेसह बेटावरील कार्यरत असलेल्या सर्वच शासकीय विभागांवर अतिरिक्त ताण वाढतो. त्यामुळे बेटावर हजारोंच्या संख्येने येणाऱ्या देशी-विदेशी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतो. तैनात असलेल्या सुरक्षा यंत्रणेसह अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे तर सर्वच शासकीय विभागांची पर्यटकांच्या सुरक्षेसाठी चांगलीच तारांबळ उडते. यावर बेटावर कार्यरत असलेल्या सर्वच विभागाने या वेळी बेटावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विविध उपाययोजना करण्याची चर्चा झाली. त्यावर उपाययोजना म्हणून सर्वच विभागाने सतर्क राहावे, असे आवाहन वपोनि औदुंबर पाटील यांनी केले. यावर सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी सज्ज असल्याचे सांगितले.