वाणिज्यिक गाळ्यासमोरील ‘मार्जिनल स्पेस’ आणि पार्किंगच्या जागेचा गैरवापर करणाऱ्या नवी मुंबईतील दहा बडय़ा हॉटेल्स आणि बार रेस्टॉरन्टवर पालिका प्रशासन कारवाई करणार असून, त्यांची तपासणी करण्यासाठी दोन साहाय्यक आयुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर हा आदेश दिला असून नवी मुंबईत मार्जिनल स्पेस हडप करणारी अनेक हॉटेल्स असून त्याला प्रभाग अधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे. नवी मुंबईत अनेक भागात बेकायदेशीर बाबींचा भस्मासूर पसरला असून त्याला हॉटेल्स अपवाद नाहीत. शहरात एक हजारापेक्षा जास्त छोटी-मोठी हॉटेल्स असून त्यांना मध्यंतरी शुल्क आकारून मार्जिनल स्पेस वापरण्याची परवानगी देण्याच्या हालचाली पालिका प्रशासनाने सुरू केल्या होत्या, मात्र जनतेचा विरोध लक्षात घेता ही परवानगी रद्द करण्यात आली. बोटावर मोजण्या इतके हॉटेल्सवगळता नवी मुंबईत बऱ्याच हॉटेल्सने मार्जिनल स्पेस, टेरेस, आणि समोरच्या पार्किंगच्या जागा व्यवसायिक वापरासाठी हडप केलेल्या असल्याचे आढळून आले आहे. याविरोधात एका नागरिकाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून न्यायालयाने १२ फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेने यासाठी साहेबराव गायकवाड आणि सुभाष वाघमारे या दोन साहाय्यक आयुक्तांची नियुक्ती केली असून पाच दिवसात या दहा हॉटेल्सच्या जागांचा प्रत्यक्षात जाऊन पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या पाहणीत त्या हॉटेल्सने केलेले बेकायदेशीर बांधकाम आढळून आल्यास त्यावर त्वरित कारवाई करण्यात येणार असून तसा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे. पालिकेच्या तपासणी रडारवर असलेली दहा हॉटेल्स * कपल बार अॅन्ड रेस्टॉरन्ट, वाशी सेक्टर १९ डी * हॉटेल पंचरत्न, कोपरखैरणे, डी मार्टजवळ * हॉटेल शिकारा, तुर्भे सेक्टर २४ * हॉटेल अॅपेटाइट, सेक्टर २४ तुर्भे * योगी एक्सक्लुझिव्ह सेक्टर ३१ अ तुर्भे * हॉटेल नवरत्न, वाशी सेक्टर १७ * हॉटेल कढई, सेक्टर ९ ऐरोली * हॉटेल गरम मसाला, सेक्टर ९ ऐरोली, * हॉटेल साईबाबा ट्रीट, ऐरोली * हॉटेल भगत ताराचंद, वाशी सेक्टर १९ डी * मॅकडोनल्ड, वाशी सेक्टर १७ * हॉटेल विजया, सेक्टर ९ ऐरोली मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने ही तपासणी केली जाणार असून, त्यासाठी नियोजन विभागाकडे या दहा हॉटेल्सचे आराखडे मागविण्यात आले आहेत. या आराखडय़ानुसार त्यांनी बांधकाम केले आहे की नाही ते पाहिले जाणार असून, मार्जिनल स्पेस, टेरेस, मागील जागा आणि पार्किंगच्या जागेचा गैरवापर झाला असल्याचे आढळून आल्यास तत्काळ कारवाई केली जाणार आहे. -अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका