पोलीस आणि अग्निशमन दल वगळता संपूर्ण सरकारी यंत्रणा गणेशोत्सवाच्या काळात सुटीवर गेल्याने तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांनी गणेशोत्सवाचे निमित्त साधून गणेशाच्या आगमनाच्या दिवशी संध्याकाळी परिसरात प्रदूषणाचे मोठे लोट सोडले. या प्रदूषणामुळे औद्योगिक वसाहतीलगतच्या ग्रामस्थांना गणेशोत्सवाची पहिली रात्र दारे-खिडक्या नाक मुठीत धरून काढावी लागली.
लहान-मोठे साडेसहाशेहून अधिक कारखाने असलेल्या तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये बीईएल नाका ते तोंडरे फाटा आणि देना बँक ते पेंधर फाटा या परिसरात गुरुवारी रात्री मोठय़ा प्रमाणात प्रदूषण जाणवले. हे प्रदूषण नेमके कोणत्या कंपनीचे आहे हे समजू शकले नाही. याच प्रदूषणामुळे नावडे गाव आणि वसाहतीमधील नागरिक त्रस्त झाले आहेत.
३ फेब्रुवारीला राज्याचे पर्यावरण खात्याचे राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी तळोजा औद्योगिक वसाहतीला भेट दिली होती. याच भेटीत त्यांनी प्रदूषण करणाऱ्या सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या (सीईटीपी) संचालक मंडळाला धारेवर धरले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दीड वर्षांमध्ये येथील प्रदूषणाची परिस्थिती बदलेल असे आश्वासन त्यांनी दिले होते.
येथे वर्षांनुवर्षे प्रदूषण होत असले तरीही प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकाऱ्यांना यास जबाबदार असणारे कारखाने सापडत नाहीत. त्यामुळे आजपर्यंत कोणत्याच कारखान्यावर ठोस कारवाई होऊ शकली नाही. नावडे वसाहतीमधील विजय चत्तर या जागरूक नागरिकाने याबाबत नियंत्रण मंडळातील अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत.