सिडको मंडळाने खाडी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात भराव करुन वसाहती वसविल्या आहेत. त्यामुळे समुद्र सपाटीपेक्षा खोल भुयारी मार्ग बांधल्यास त्यामध्ये पाणी साचण्याची भिती नेहमीच सर्वच सिडको वसाहतींना असते. तळोजा (पाचनंदनगर) वसाहतीचे प्रवेशव्दार भुयारी मार्गात काढल्याने तीनही ऋतूंमध्ये भुयारी मार्गात पाणी साचण्याची समस्या वाहनचालकांना डोकेदुखी ठरत आहे. वर्षभरापूर्वी याच भुयारी मार्गातील चिखलातून दुचाकी चालविताना झालेल्या अपघातामध्ये एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पावसाळ्यानंतर हिवाळ्यातही पाणी साचत असल्याने तळोजा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक महेश पाटील यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र व्यवहार करुन भुयारी मार्गात होणारी पाणी गळती थांबविण्याचे काम हाती घेण्याची सूचना केली.
हेही वाचा: नवी मुंबई: ऑनलाईन गुंतवणूक करणे पडले महागात; तरुणीची तब्बल ११ लाखांची फसवणूक
यानंतर रेल्वे प्रशासनाने हे काम शुक्रवारपासून हाती घेतल्याने हा भुयारी मार्ग चार दिवस वेगवेगळ्या मार्गिकांवर दुरुस्तीसाठी प्रवेश बंद ठेवण्यात येणार असल्याची अधिसूचना नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी जाहीर केली आहे. शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून ते शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत तळोजा वसाहतीमध्ये जाणारा भुयारी मार्गावर वाहतूक बंद राहील तसेच शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत वसाहतीमधून आर.ए.एफ सिग्नलकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त काकडे यांनी काढलेल्या अधिसूचनेत जाहीर केली आहे. दुरुस्ती दरम्यान वाहनचालक पेणधर रेल्वे फाटकाच्या मार्गाने प्रवास करु शकतील असे आवाहन वाहतूक पोलीसांनी केले आहे.