लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल : खारघर उपनगरात पाणीटंचाई मिटविण्यात सिडको मंडळाला अपयश येत असल्याने दीड कोटींचे घर आणि पिण्यासाठी टँकरने पाणी खरेदी करण्याची वेळ सेक्टर ३४ व ३५ मधील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांवर आली आहे. सिडको मंडळाच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कार्यालयाला वारंवार भेटी दिल्यानंतरही अधिकारी कायमचा तोडगा काढू शकत नसल्याने रहिवासी संतापले आहेत.

खारघर उपनगरातील अनेक सेक्टरमधील रहिवासी अनेक महिन्यांपासून पाणी टंचाईचा सामना करत आहेत. सध्या मार्च महिन्यापासून तर टँकरच्या पाणी खरेदीसाठी सोसायटीमधील सदस्यांना महिन्याला एक ते सव्वा लाख रुपये खर्च येत असल्याचे नागरिक सांगत आहेत. सिडको मंडळाच्या खारघर येथील पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून आणि लेखी निवेदने देऊनही पाणीप्रश्न सोडवला जात नाही. पाण्यावर कायमचा उतारा म्हणून सोसायटीने खर्च करुन जमिनीखाली बोअरवेल खणल्या मात्र त्यामधून येणारे पाणी पिण्यायोग्य आणि वापरण्यायोग्य नसल्याने खासगी टँकरचे पाणी खरेदी करावे लागते.

सिडको मंडळाच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी सिडको मंडळाकडे तक्रारी केल्यास संबंधित तक्रारींचे चौकशी करुन टँकर पाठवू असे आश्वासन रहिवाशांना दिले आहे. सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाने खारघरमध्ये दिवसाला दीडशेहून अधिक टँकरने पाण पुरवठा केला जातो असाही दावा केला आहे. मात्र वारंवार मागणी केल्यानंतर पाच दिवसांत एक टँकर पाणी दिले जाते. पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी फोन उचलत नाही, अशा तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.

आमच्या सोसायटीमध्ये ५२ घरे आहेत. सव्वा ते दीड कोटी रुपयांचे घर परंतु पाणी टंचाईची समस्या मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. ३२ युनिट पाण्याची गरज असताना १४ ते २१ युनिट पाणी पुरवठा केला जातो. दिवसाला पाण्याचे दोन टँकर मागवावे लागतात. सोसायटी महिन्याला टँकरच्या पाण्यासाठी दीड लाख रुपयांचा खर्च करावा लागतो. -हॅना ख्रिचन, अध्यक्ष, ओव्हेल सोसायटी, सेक्टर – ३४ सी

सिडकोमार्फत हेटवणे पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दिघाटी येथील दाबरोधक यंत्रणेच्या पर्यायी कामाची पूर्तता मार्च २०२५ पर्यंत अपेक्षित आहे. तसेच गणपतीवाडी-तरणखोप दरम्यान १५०० मि.मी. व्यासाच्या जुन्या जलवाहिनीऐवजी १८०० मि.मी. व्यासाची एम.एस. जलवाहिनी बसवण्याचे काम जुलै २०२५ पर्यंत पूर्ण होईल. या कामांमुळे पाणीपुरवठा १० ते १५ एमएलडीने वाढेल, खारघरमधील दोन ते तीन एमएलडी पाण्याची तूट भरून निघेल व अनियमित पाणीपुरवठा समस्या सुटेल. -प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको