शिक्षक दिन विशेष
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती आहात, पण तुमच्या कुटुंबाचे जग तुम्ही आहात, हे कधीच विसरू नका! समाजात ही शिकवण रुजवण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील मुख्याध्यापक अयाजुद्दीन शेख अली यांनी राष्ट्रीय स्तरावरचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवण्याबरोबरच सामाजिक कार्यातदेखील शेकडो पुरस्कार मिळवून नवी मुंबईचे नाव उज्ज्वल केले आहे.
ठाणे जिल्ह्य़ातील दुर्गम अशा पालघर जिल्ह्य़ातील वेंगणी तालुक्यात शेख यांचा जन्म झाला. बीए, बीएडची पदवी धारण केल्यानंतर शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरातील पालिकेच्या कोपरखरणे शाळा क्रमांक २३ येथे ३२ वर्षांपासून विद्यादानाचे पवित्र कार्य ते करीत आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना दिवंगत माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्तेदेखील त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातही त्यांनी मौलिक कार्य केले आहे.
मारकंडे अंजुमन इलेहाद कमिटी आणि फलाह एज्युकेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून त्यांनी सर्वधर्मसमभावनेची शिकवण ठाणे जिल्ह्य़ात रुजवली आहे. महाराष्ट्र कला-क्रीडा मंडळाचा आदर्श शिक्षक पुरस्कारही त्यांना लाभला आहे. मुरबाडसारख्या भागामध्ये जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर शाळाबाह्य़ मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणणे, रामायण संस्कार परिषदेतून रामचरित्रांचा जागर, रमजान ईदच्या निमित्ताने घरगुती साहित्याचे वाटप करणे, अशा विविध सामाजिक उपक्रमांनी शेख यांनी सामाजिक एकात्मता जोडली आहे.शेख सरांच्या मार्गदर्शनामुळे कोपरखरणे शाळा क्रमांक २३ मधील विद्यार्थी अनेक क्षेत्रात चमकले आहेत. नवी मुंबई शहरात होणाऱ्या कला-क्रीडा सांस्कृतिक उपक्रमात शाळेने नेहमीच सुयश मिळवले आहे. पालिकेच्या विज्ञान प्रदर्शनात सातत्याने १२ वेळा प्रथम क्रमांक मिळविण्यात शेख सर यांचा मोठा वाटा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा