नवी मुंबई :  नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांना वेतन प्रक्रिया सुरू होण्यासाठी शाळांत क्रमांक दिला जात नसल्याने वर्षानुवर्ष विना वेतन काम करावे लागत असल्याचा आरोप करीत मुंबई विभागीय मंडळावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यात दोनशेपेक्षा अधिक शिक्षकांचा सहभाग होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कनिष्ट महाविद्यालय शिक्षकांचे वेळोवेळी रखडणारे मानधन आणि मुख्यत्वे शाळांत क्रमांक दिरंगाईविरोधात शिक्षकांनी मोर्चा काढला होता. दुपारी एकच्या सुमारास जोरदार घोषणाबाजी करीत वाशी रेल्वे स्टेशन ते मुंबई शिक्षण विभागीय मंडळ कार्यालय, असा मोर्चा काढण्यात आला होता. मुंबई विभागातील कनिष्ट महाविद्यालय शिक्षकांचे मानधन, तसेच शाळांत क्रमांक देण्यासाठी  मंडळ मोठ्या प्रमाणात हयगय करते. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी मोर्चात सहभाग घेतला. यावेळी शाळांत क्रमांक देण्यासाठी वैयक्तिक बोलावून बैठका घेणे बंद करीत पारदर्शकता आणावी, शिक्षकांना सन्मानाची वागणूक द्यावी, परीक्षा फी दिवाळीपूर्वी घेतली जाते, मात्र पेपर तपासणी व अन्य कामांचे मानधन वेळेवर दिले जात नाही, ते देत जावे, अशा मुख्य मागण्या मंडळासमोर ठेवण्यात आल्या.

हेही वाचा – नात्याला काळीमा! खाटीक पित्याने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

“कुठलाही नवीन शिक्षक रुजू झाला की त्याचे वेतन मिळण्यास विनाकारण तांत्रिक अडचणी दाखविल्या जातात. हे बंद करून पारदर्शक कारभार करावा. मंडळाने आम्हाला शिक्षक म्हणून सन्मान द्यावा, या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून आता मान्य झाल्या नाही तर अधिक उग्र आंदोलन छेडले जाईल”, असा इशारा मुंबई विभागीय कनिष्ट महाविद्यालय संघटनेचे सचिव मुकुंद आंदळकर यांनी दिला.

“आंदोलकांनी मंडळाला भेट देत निवेदन सादर केले. यावेळी येत्या १० दिवसांत सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. जर हे आश्वासन पाळण्यात आले नाही तर परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात येईल”, असा इशारा आम्ही दिला असल्याचे मुंबई कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष एस.एल. दीक्षित म्हणाले.

हेही वाचा – नवी मुंबई : उद्यानात आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

काय आहे शाळांत क्रमांक?

शाळांत ओळख क्रमांक हा एका संस्थेसाठी एकच असतो. त्यात प्रत्येक शिक्षकाचा विशिष्ठ क्रमांक असतो जो वेतन बँक खात्यात जमा करण्यासाठी जोडला जातो (लाँगिन आय डी) हा क्रमांक शिक्षकांना लवकर दिला जात नाही, त्यासाठी खेटे मारावे लागतात. वैयक्तिक भेट घेतली जाते त्यातून भ्रष्ट्राचार होतो, असा दावा अनेक शिक्षकांनी केला.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teachers morcha various demands in navi mumbai warn of boycott of exams ssb